![]()
राधानगरी / अरविंद पाटील
मुंबई येथील आझाद मैदानावर ५ जून पासून महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी भर पावसात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूर विभागातील अनेक शिक्षक, महिला भगिनी आंदोलन करत आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात १० ऑक्टोंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी राज्यातील सुमारे ५३ हजार शिक्षकांना वाढीव टप्पा देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. परंतु या निर्णयासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद हिवाळी अधिवेशन व अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाने केली नसल्याने राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षक बांधवात कमालीची नाराजी पसरली. यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वात राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलना दरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदार विक्रम काळे, किरण सरनाईक, जयंत आसगावकर, किशोर दराडे, सत्यजित तांबे, यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, व शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मुंबईत भेटी घेऊन या शासन निर्णयासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद आगामी पावसाळी अधिवेशनात करावी अशी मागणी केली.
२३ व २४ जून रोजी सहभागी होण्याचे केले आवाहन
राज्याचे पावसाळी अधिवेशन ३० जून पासून सुरू होत असून या अधिवेशनातील पूरक मागण्या मंजूर करण्यासाठीची व्यय अग्रक्रम समितीची बैठक ही २४ जून रोजी होणार असून या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी दोन दिवस म्हणजेच २३ व २४ जून रोजी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.
