धनगर वाड्यावर तात्काळ सोयी सुविधा पुरवा : आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रशासनाला सूचना

धनगर वाड्यावर तात्काळ सोयी सुविधा पुरवा : आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रशासनाला सूचना

Loading

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील धनगर वाड्यांचे वास्तव लक्षात घेवून प्रशासनाने मानुसकीच्या दृष्टीने तेथील बिकट परिस्थितीचा आढावा घेवून त्यांना तातडीने सोयीसुविधा पुरवा अशा सुचना आमदारा शिवाजीराव पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. मंगळवारी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नुकतीच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कानूर खुर्द येथील धनगरवाड्याला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला होता. त्यांनी स्वतः अनवानी पायांनी फिरत तेथील वास्तव परिस्थिती पाहिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार चंदगड तालुक्यातील धनगर वड्यांवरील बिकट परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. त्याच पार्श्वभुमीवर आज प्रशासकीय बैठकीत तालुक्यातील सर्व सोळा धनगर वाड्यावर सर्व्हे करून सुविधांची गरज, तेथिल परिस्थिती याची माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी या सर्व वाड्यावर तलाठी, ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष जाऊन माहिती संकलित करावी, आवश्यकता भासल्यास अशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व बांधकाम विभागाच्या अधिका-यांची मदत घ्यावी. कामात कसूर खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही प्रांताधिकारी काळबांडे यांनी दिला. या बैठकीत कोवाड येथील पूर परिस्थितीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. आमदार पाटील यांनी या प्रश्नावर शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही ताम्रपर्णी नदीतील गाळ काढला जात नसल्याने नाराजी व्यक्त केली.

पावसापूर्वी ताम्रपर्णी नदीतील गाळ त्वरित काढण्याची सूचना पाटबंधारे विभागाचे उपअभियंता डी.डी. शिंदे यांना दिली. तसेच सध्या सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करावे, शासनाकडून मिळणा-या पाच ब्रास वाळूचा लाभही लाभार्थ्यांना मिळवून द्यावा अशा सूचनाही आमदार पाटील यांनी केल्या. त्यासाठी तालुक्यातील नद्या, ओढे यांच्यातील वाळू उपसा करून लाभार्थ्यांना द्याव्यात असं सांगितलं. या वाळू उपशासाठी तालुक्यातील नद्याच्या बंधा-यावरील बर्गे काढून पाण्याचा निचरा करावा, जेणेकरून वाळू उपसा करण्यास मदत होईल असे निर्देशही जलसंपदा विभागाला त्यांनी दिले.

नवीन घरकुलांसाठी अर्ज करण्याची मुदत १८ जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. जितक्या घरकुलांचे काम सुरू आहे त्यांना ५ ब्रास वाळू देण्यात येईल. वाळू ही आजूबाजूच्या नदिपात्रातून काढण्यासाठी प्रशासन मदत करणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जागा सुचवल्यास तिथून वाळू उपसा करता येणार आहे.

गडहिंग्लज तालुक्यात पहिल्या टप्यात ३५२८, दुस-या टप्यात २९२९ घरकुल मंजूर झाले असून २६ ठिकाणे वाळू उपसासाठी स्पॉट केले आहेत. तर चंदगड तालुक्यात एकूण घरकुल ७४२२ मंजूर झाले असून तालुक्यातील ३२ ठिकाणे ठेकाणे स्पॉट केली आहेत. आजरा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीमधील ११२१ घरकुल मंजूर झाली आहेत.

यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, संतोष तेली, नामदेव पाटील, भारती जाधव, लक्ष्मण गावडे, सचिन बल्लाळ यांच्यासह गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंते, तलाठी, ग्रामविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *