![]()
बस मालक, चालक व क्लिनर वर गुन्हा दाखल
चंदगड : प्रतिनिधी
तावरेवाडी तालुका चंदगड येथील म्हातारू रामचंद्र कागलकर हे खाजगी बस मधून प्रवास करीत असताना त्यांच्याकडील जवळपास सात लाखाचा मुद्देमाल असलेल्या त्यांच्या बॅग बसमधून लंपास केल्या. याप्रकरणी बसचा मालक चालक आणि क्लिनर अशा तिघांवर संबंधित प्रवाशाची बॅग लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ केसरकर (ट्रॅव्हल्स चे मालक), कपिल टिक्का (ट्रॅव्हल्स चे चालक), संजीव करंजीचे (ट्रॅव्हल्स चे क्लीनर) अशी संशयीतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी म्हातारू कागलकर हे
केसरकर ट्रॅव्हल्स गाडी नंबर एम एच 09 एफ एल 1572 मधून प्रवास करीत असताना फिर्यादी कडील बॅगेमध्ये रोख रक्कम आणि किमती वस्तू असल्याची माहिती संशयित आरोपींना फिर्यादी यांनी दिली होती. त्यावेळी संशयित आणि फिर्यादींना त्यांची वस्तू व रक्कम त्यांच्याकडे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. संबंधित बॅग डिकी मध्ये ठेवण्यास सांगितले. नागनवाडी फाटा येथे फिर्यादी बसमधून उतरले असता त्यांची रोख रक्कम आणि किमती वस्तू असलेल्या दोन बॅगा डीकी मध्ये आढळल्या नाहीत. याबाबत फिर्यादीने बसचे मालक चालक आणि क्लिनर यांच्याशी फोनवर वारंवार विचारणा केली. मात्र त्यावेळी तुमच्या बॅगा नसतील तर नुकसान भरपाई पण देतो पण पोलीस केस करू नका अशी अर्जावणी केली. मात्र पुन्हा संशयतांना फोन केला असता संबंधित बसचे मालक चालक आणि क्लीनर सुद्धा फोन उचलत नसल्याने फिर्यादी असलेल्या प्रवाशाने किमती सामान आणि रक्कम असलेल्या दोन्ही बॅगा चोरल्याची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल देसाई यांनी ही फिर्याद दाखल केली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक पुढील तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

