![]()
आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे समस्येकडे लक्षवेध

आजरा : प्रतिनिधी –
येथील मृत्युंजय ग्रामीण रुग्णालय हे अत्यावश्यक लसी विना तडफडत असून अत्यावश्यक लसींच्या कमतरते बाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने या समस्येकडे लक्षवेध केला आहे. डॉ. सुश्रृत जमदाडे यांना समितीने तसे निवेदन दिले. या प्रकरणी पार्श्वभूमी थोडक्यात अशी कि, कु. प्रथमेश बयाजी कोकरे रा. आवंडी धनगरवाडा याला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्याला या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णास ए.आर.व्ही.लस टेस्ट केली असता त्या उपचाराचा दुष्परिणाम दिसून आला. त्यामुळे दुसरी लस उघडून दुसऱ्या हातावर चाचणी केली. त्यावेळी पुन्हा दुष्परिणाम दिसून आला. रुग्णाला तातडीने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे रवाना करण्यात आले. तेथून पुढे जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे रुग्णास दाखल करण्यात आले.समिती प्रतिनिधींना अशी माहिती डॉ.जमदाडे यांनी दिली.तर रुग्णावर गंभीर दुष्परिणाम दिसून आल्याने तातडीने पुढील उपचार व्हावेत म्हणून काळजीपूर्वक निर्णय घेण्यात आल्याचा खुलासा वैद्यकीय अधिकारी जमदाडे यांनी केला.रुग्णालयात सर्व प्रकारच्या लशी व तातडीच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले.लसींची कमतरता असल्याचा उल्लेख रुग्णाच्या नातेवाईकांकडून गैरसमजुतीमुळे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे,सचिव पांडुरंग सावरतकर,दिनकर जाधव रामचंद्र पंडीत, मिनीन डिसोझा,जावेद पठाण,जोतिबा आजगेकर, मदन तानवडे आदि उपस्थित होते.