योग्य दुरुस्ती करून सावळा गोंधळ दूर करा : अन्याय निवारण समितीची मागणी

Loading

आजरा : हसन तकीलदार

या नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीचे वारे वाहू लागले असून निवडणूक निर्णय विभागाचे सर्व काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. मतदार यादीमध्ये असलेल्या चुका दुरुस्तीचे काम सध्या सुरु असून संभाव्य उमेदवारांनी त्यांच्या सोयीनुसार खोट्या पुराव्यांच्या आधारे घडवून आणलेले बदल अशी गोंधळजन्य अवस्था सध्या दिसत आहे. ही दुरुस्ती योग्य प्रकारे करावी आणि या प्रक्रियेमध्ये सुरु असलेला गोंधळ दूर करावा अशी मागणी आजरा अन्याय निवारण समितीने केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व आजरा तहसीलदार यांना समितीने तसे निवेदन दिले आहे. मतदार याद्या दुरुस्ती व हरकतीबाबतचे कामकाज युद्ध पातळीवर सुरु असून या मतदार यादीतील चुका या गंभीर आहेत असा आरोप करीत अनियमितता तसेच बोगस मतदार यांचा भरणा दिसून येत असल्याचीही तक्रार आहे. संभाव्य उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार मतदार आपापल्या वॉर्डात खोटे पुरावे सादर करून नोंदणी करून घेतल्याचे आरोप होत आहेत.

“चेहरा नवा, बदल हवा” : युवा वर्ग सरसावला

आजरा नगरपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेपासून इच्छुकांची भाऊ गर्दी वाढतच चालली असून राजकारणातील घराणेशाही आणि ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी युवा वर्ग सरसावत आहे. “चेहरा नवा, बदल हवा “असे म्हणत अनेक नवे युवा चेहरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर जुने राजकीय ठेकेदार आपला विजय निश्चित करण्याच्या दृष्टीने अनेक खेळ्या करीत आहेत. बोगस मतदार नोंदणी करून आपल्या वॉर्डात सोयीचे आणि खात्रीचे मतदार आणले जात आहेत. यासाठी अन्याय निवारण समितीने याविरोधात निवेदन देत अनेक मतदारांची दुबार झालेली नोंदणी, काही मतदारांची खोट्या पत्त्यावर इतर प्रभागात स्थानांतरित करण्यात आलेली नावे, नगरपंचायत हद्दीत प्रत्यक्ष वास्तव्यास नसलेले अनेक मतदार खोट्या पत्त्याचा आधार घेऊन यादीत समविष्ट करण्यात आली आहेत. यापैकी काही व्यक्ती या परिसरातील ग्रामपंचायतीमधील सदस्य अथवा पदाधिकारी असल्याचेही दिसत असून त्यामुळे वरील प्रकार अत्यंत गंभीर आहे. आणि निवडणूकीचा निकाल व लोकशाही प्रक्रियेवर थेट परिणाम करणारा आहे.

त्यासाठी खोट्या पत्त्यावर नोंदणी असलेल्या सर्व मतदारांची चौकशी करावी आणि त्यांची नावे रद्द करावीत, दुबार नोंदी त्वरित वगळाव्यात आणि चोख, सत्य व अचूक मतदार यादी प्रकाशित केल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये अन्यथा जनजागृती मोहीम, आंदोलन व उपोषणासारख्या लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा इशारा या निवेदनात आहे. या निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी), उपाध्यक्ष गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, विजय थोरवत, दिनकर जाधव, मदन तानवडे, जावेदभाई पठाण, संजय जोशी, मिनिन डिसोझा, संतोष बांदिवडेकर आदींच्या सह्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *