![]()
महाराष्ट्र राज्य संघटन सचिव संदीप देसाई यांची घोषणा


जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढायचीच यासाठी भेटीगाठी घेत आहेत त्यातच
आम आदमी पार्टीकडून जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातील नगरसेवक पदांसाठी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा शनिवारी (दि. 11 ऑक्टोबर 2025) जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेत पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव श्री.संदीप देसाई यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, “आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असून, भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक विकासासाठी जयसिंगपूरसारख्या शहरात एक आदर्श पर्याय उभा करण्याचा आमचा संकल्प आहे. दिल्ली व पंजाबमधील विकास कामाच्या धर्तीवर जयसिंगपूर शहराचा विकास करणार आहोत.”
यावेळी नगराध्यक्ष पदासाठी श्री.सुदर्शन कदम यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. कदम यांनी सांगितले की, ते आम आदमी पार्टीच्या वतीने “लोक वर्गणीतून” निवडणूक लढवणार असून नागरिकांशी थेट संवाद साधून शहराचा विकास आराखडा राबवणार आहेत.
त्यांनी आपल्या निवडणूक कार्यक्रमात नगरपालिका शाळांचा विकास, ‘मोहल्ला क्लिनिक’ उभारून मोफत वैद्यकीय सेवा, शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा, उद्याने विकास, भाजी मंडईचे स्थलांतर, सार्वजनिक शौचालयांची सुधारणा, वाहतूक व्यवस्था नियोजन आणि घरपोच दाखला सुविधा अशा उपक्रमांचा समावेश असल्याचे सांगितले.
या प्रसंगी शिरोळ तालुका अध्यक्ष नितीन जाधव यांनी पत्रकारांना निवडणुकीत निष्पक्ष भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे यांच्या उपस्थितीत “आप लढणार, बदल घडणार” या घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष सागर म्हेतर, जिल्हा कमिटी सदस्य जयंतीलाल पटेल,इकबाल सुदरने,बाळासाहेब हसुरे, शंकर कदम,विशाल कांबळे,प्रमोद भोजे आदि उपस्थित होते.