कुरुंदवाडच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार : आमदार यड्रावकर

Loading

कुरुंदवाड : प्रतिनिधी
जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे कुरुंदवाड शहरातील सर्वच विकास कामे मार्गी लागलेली आहेत मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेल्या कुरुंदवाड शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत मी खोलात जाणार नाही, मात्र हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो येणाऱ्या काही दिवसात मीच मार्गी लावणार आहे, अशी ठाम ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी करावं, पण या राजकारणात नागरिकांचे हाल होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, कुरुंदवाड शहराच्या उशाला दोन नद्या असूनही, पंधरा वर्षांपासून नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. नगरोत्थान योजनेतून या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला होता, मात्र ठेकेदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे योजना रखडली. मी दोषारोपाच्या राजकारणात न पडता नागरिकांच्या हितासाठी या योजनेला गती देणार आहे.
ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या ठेकेदाराने न्यायालयीन बाब दाखल केली आहे, त्याच्याशीही चर्चा सुरू आहे. सुधारित प्रस्ताव तयार करून तांत्रिक मंजुरी घेतली आहे. मात्र निधीअभावी काम थांबले होते. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडातून सुमारे ५० कोटींची मागणी केली आहे. काही दिवसांतच प्रस्ताव मंजूर होईल आणि कुरुंदवाडकरांना पाणीपुरवठ्याचा दिलासा मिळेल.
दरम्यान, त्यांनी सांगितले की, जयसिंगपूर आणि शिरोळप्रमाणे कुरुंदवाड शहरातही भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. पाणीपुरवठा आणि गटार योजना एकत्रितपणे राबविल्यास रस्त्यांची हानी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली आहे.
कुरुंदवाडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, मी राजकारणात पडणार नाही. माझे लक्ष फक्त नागरिकांच्या प्रश्नाच्या समाधानाकडे आहे. येणाऱ्या काही दिवसांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि ही योजना मीच पूर्णत्वास नेणार आहे, असे ठाम विधान आमदार यड्रावकर यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *