दौलत कारखान्यावरचे संकट कायमचे दूर करत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार 

Loading

डी.आर.टी न्यायालयाच्या आदेशाने दौलत कारखान्याचा लिलाव रद्द 

चंदगड : राजाराम कांबळे                    

हलकर्णी ता.चंदगड येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर असलेले एस.डी.एफ चे ४४ कोटी रुपयांचे कर्ज केडीसीसी बँकेने भरून ९ ऑक्टोबर रोजी होणारी दौलत कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवावी, तसेच कारखाना सहकारतच ठेवून चंदगड तालुक्यातील सभासद,शेतकऱ्यांच्या विकासाला गती द्यावी. यासाठी दौलत बचाव कृती समितीचे सदस्य व ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई व दौलत कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे यांनी ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापुर येथे केडीसीसी बँकेसमोर आमरण उपोषण केले होते. आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी बँकेचे चेअरमन नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी अथर्व कंपनीने संबंधित कर्ज भरले नाही तर बँक भरणार असल्याचे सांगितले असताना दिल्लीच्या डी.आर.टी न्यायालयाने दौलतचा लीलाव रद्द करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे चंदगड तालुक्याचे माजी आमदार व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, दौलत कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गोपाळराव पाटील यांनी उपोषणकर्ते सुभाष देसाई व चंद्रशेखर गावडे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यावेळी दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड.एन.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे उपोषणकर्ते यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा करून उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी दौलत बचाव कृती समिती ही भारतीय संविधान व कायद्याचे पालन करणारी संघटना आहे. तेव्हा दिल्लीच्या न्यायालयाचा मान राखून आम्ही उपोषण मागे घेत आहोत परंतु जोपर्यंत अथर्व कंपनी किंवा केडीसीसी बँक एस.डी.एफ चे कर्ज भरून दौलत कारखान्यावरचे संकट कायमचे दूर करत नाही तसेच २०१०-११ ची शेतकरी व कामगारांची थकीत देणी मिळत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते सुभाष देसाई व चंद्रशेखर गावडे यांनी सांगितले. 
दौलत कारखाना हा चंदगड,आजरा,गडिंग्लज तसेच सीमाभागातील सभासद,शेतकरी व कामगारांची अर्थवाहिनी आहे. कारखाना टिकला तरच तालुक्याचा विकास होणार आहे. त्यासाठी तो सहकारातच राहिला पाहिजे याची जाण चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना, सभासद,शेतकरी,कामगार,कार्यकर्ते व हितचितक यांना झाल्याने या सर्वांनी मोठ्या उत्साहाने कारखाना वाचवण्यासाठी कोल्हापुर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भरभरून पाठिंबा दिला. या सर्वांचे दौलत बचाव कृती समिती जाहीरपणे आभार मानत आहे. मात्र एक गोष्ट खरी आहे की, सुभाष देसाई व चंद्रशेखर गावडे यांच्या आमरण उपोषणामुळे तालुक्यात नवा इतिहास घडणार असल्याचे संकेत असल्याची चर्चा तालुक्यातील सुज्ञ व जाणकार मंडळीत आहे. यावेळी गेल्या चार दिवस सुरू असलेल्या आमरण उपोषणाला चंदगड विधानसभेचे माजी आमदार राजेश पाटील, तालुक्याचे नेते गोपाळराव पाटील, ॲड. सुरेश कुऱ्हाडे, शिवसेनेना उद्वव बाळासाहेब ठाकरे चे सहप्रमुख विजय देवणे, हाजी अस्लम सय्यद प्रा.सुनिल शिंत्रे,हर्षल पाटील शिवसेना वाहतूक, शिवाजी भांबर हलकर्णी, आदींनी पाठींबा दिला असून जनशक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी.जी.भास्कर, उपाध्यक्ष रमेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते बबन शिंदे गोकुळ शिरगांव, कुदनुर ता.चंदगड येथील सर्व शेतकरी बांधव. दौलत कारखान्याचे आजी-माजी संघटनेचे पदाधिकारीअशा शेकडो नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल दौलत बचाव कृती समितीच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. 
प्रा. ॲड.एन.एस.पाटील (अध्यक्ष दौलत बचाव कृती समिती), सदस्य सुभाष देसाई, चंद्रशेखर गावडे, विष्णू गावडे, तानाजी गडकरी, पांडूरंग बेनके, शामराव मुरकुटे, शंकर मनवाडकर, धोंडीबा नाईक इ. मंडळीचे सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *