![]()
गुन्हा दाखल 40 लाखांची गाडी जप्त

जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील झेले चित्र मंदिराजवळील आदिसागर अपार्टमेंटमध्ये असलेल्या व्हीबीएसएल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात १७ मे २०२४ ते १६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीचे प्रमुख विजय नाथा जगदाळे, संचालक सौ. नंदा विजय जगदाळे तसेच एजंट सचिन उदगावे, सलीम आळतेकर आणि संकेत सूर्यवंशी यांनी संगनमत करून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याची फिर्याद उत्तम दत्तात्रय निकम (वय वर्षे 60),रा.आर.के.नगर सोसायटी पाचगाव यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली होती.
कंपनीने आयुर्वेदिक औषधे, गुणकारी पेये आणि दैनंदिन वापरातील वस्तूंच्या विक्रीसाठी फ्रँचायसी देण्याचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांना ठराविक रक्कम कंपनीत गुंतविण्यास सांगून त्याबदल्यात प्रॉडक्ट, गाळाभाडे, कामगार पगार आणि विक्रीतील ३० टक्के नफा दिला जाईल असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणताही नफा न देता गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी २२ ऑगस्ट २०२५ रोजी जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासा दरम्यान कंपनीमार्फत सुमारे ९५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी विजय नाथा जगदाळे याच्याकडून ४० लाख रुपये किंमतीची ऑडी कंपनीची गाडी जप्त केली आहे.
या प्रकरणात आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युनूस इनामदार करत आहेत .
