![]()
श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांच्या शिष्टमंडळाची मागणी
आजरा – हसन तकीलदार
२ मिटर उंची वाढवल्याने बुडीत क्षेत्राचे नवीन कायद्याने संपादन होऊन पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे, ६५ टक्के रक्कम कपात करून संकलन दुरुस्त करून प्रकल्पग्रस्ताना पुनर्वसनाचा लाभ द्यावा या मागणीचे निवेदन श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांच्या शिष्टमंडळाने दिले. याबाबत ५ मे पर्यंत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यासमवेत बैठक झाली नाही तर मोर्चाने उंचगी धरणाचे काम बंद करण्याचा इशारा दिला. कोल्हापूर पाटबंधारे परिमंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता यांना हा इशारा दिला आहे.

उचंगी प्रकल्पाची २ मीटरने उंची वाढवण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ही उंची वाढवल्याने नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचे रेखांकन केले आहे. उंची वाढवल्यानंतर बाधित होणाऱ्या क्षेत्राचे संपादन नवीन भुसंपादन कायद्याने करावे. भुसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राची 65% रक्कम कपात करून घेऊन संकलन दुरुस्त करून प्रकल्पग्रस्ताना लाभ द्यावा. २ मिटर उंची वाढवल्याने घरे बुडीतात येतात त्यांचे भुसंपादन कायद्याने संपादन करावे. पूर्वी संयुक्त मोजणी होऊन पंचनामा, मूल्यांकन झालेल्या पण संपादनातून वगळलेल्या घरांचे संपादन होऊन त्याची संपादन रक्कम त्यांना द्यावी. त्याचप्रमाणे पूर्वी संपादित झालेल्या आणि बुडीतात गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक व्हावी. नव्याने बाधित होणाऱ्या क्षेत्राचे संपादन न करता थेट खरेदी करून पुनर्वसनाचा हक्क मिळणार नाही अशी माहिती आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून प्रकल्पग्रस्ताना दिली जात आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संभ्रमावस्थेत आहेत.
या सर्व बाबीवर निर्णायक चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेसोबत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधीसह सोमवार दि. 5 मे 2025 रोजी पर्यंत बैठक घ्यावी अन्यथा मंगळवार दि. ६ मे 2025 रोजी सर्व प्रकल्पग्रस्त मोर्चाने धरणाचे काम बंद करणार असा इशारा निवेदनात आहे. या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री कोल्हापूर, जिल्हाधिकारी कोल्हापूर, उपविभागीय अधिकारी व उपअभियंता भुदरगड, आजरा यांना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनावर श्रमिक मुक्ती दल, महाराष्ट्र कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, नारायण भडांगे, निवृत्ती बापट, दशरथ घुरे, विजय पाटील, शामराव पोवार, शिवाजी बापट यांच्यासह प्रकल्पग्रस्तांच्या सह्या आहेत.
