![]()
आजरा / हसन तकीलदार
सलग तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यामध्ये काल सोमवारी मुख्य पुतळा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात, उत्साहात पार पडला. हा दिमाखदार आणि ऐतिहासिक सोहळा ठरला. मोठ्या जल्लोषात आणि आनंदात झालेल्या या दिमाखदार सोहळयाचे पुतळा सुशोभीकरण समितीने नेटके, सुयोग्य नियोजन केले. तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग, नेत्रदीपक आतषबाजी, अंगावर शहारे आणणारे शिवशाही पोवाडे मंचचे शिवशाहीर दिलीप सावंत आणि त्यांचे सहकारी, नाशिक ढोल ताशा पथक, कलश पूजन अशा कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल होती. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे होते. तर नामदार आबिटकर यांनी सर्वांचे अभिनंदन करून या अभूतपूर्व सोहळ्याचे उदघाटन करण्याचे भाग्य लाभले हेच आयुष्याचे सार्थक असल्याचा अभिमान व्यक्त केला.
स्वागत आणि प्रास्ताविक विलास नाईक यांनी केले. 1967 साली मुंबईकर गिरणीकामगार यांनी वर्गणी काढून छत्रपतींचा अर्धपुतळा तयार केला होता. कै. काशिनाथ अण्णा चराटी, कै. बळीरामजी देसाई, कै. वसंतराव देसाई यांनी पुढाकार घेऊन या पुतळ्याचे नियोजन केले होते. परंतु 2017 साली गावसभा घेऊन कै. बाबुराव कुंभार यांचे अध्यक्षतेखाली किमिटी स्थापन करून चर्चा करण्यात आली. कमिटीने अनेक पुतळे बघितले परंतु शिवाजी विद्यापीठाच्या पुतळ्याप्रमाणे पुतळा करण्याचे ठरले. त्यात बेळगावचे मॉडेल पसंत केले. कोरोनासारख्या आपत्तीमुळे दोन वर्षे फुकट गेली आणि काही तांत्रिक अडचणीही आल्या त्यामुळे या कामाला 7 वर्षे लागली. या पुतळ्याला नाम.आबिटकर यांनी 50 लाखाचा फंड दिला. खासदार मंडलिक यांनी 10 लाख, पुण्याचे गोवेकर यांनी विद्युत रोषणाईची व्यवस्था त्याचप्रमाणे रवींद्र आपटे यांनी सुद्धा देणगी गोळा करण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे विलास नाईक यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेची जागा असलेने आनंदा कुंभार आणि समीर देशपांडे यांनी पाठपुरावा केला तर यासाठी नाम. हसन मुश्रीफ यांनी मदत केली. आम. शिवाजीराव पाटील, संताजी घोरपडे साखरचे चेअरमन नवीद मुश्रीफ, पद्मजा आपटे, समितीचे अध्यक्ष महादेव उर्फ बापू टोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत व तमाम सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व पंथीय आणि सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते, महिला,युवक, युवती यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडला.
प्रारंभी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, आम. शिवाजीराव पाटील, नविद मुश्रीफ यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवाजीराव पाटील यांनी दहा लाख रुपये देणगी जाहीर केली. डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्र संचालन केले. यावेळी मुकुंददादा देसाई, सुधीर देसाई, जयवंतराव शिंपी, के. पी. पाटील,अंजनाताई रेडेकर, सुनील शिंत्रे, नागेश चौगुले, जोत्स्ना चराटी, सुनील शिंत्रे, तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी संजय ढमाळ, आलम नाईकवाडे, शौकत लाडजी, राजेंद्र सावंत, जनार्दन टोपले, परशुराम बामणे, सुधीरभाऊ कुंभार, दिवाकर नलवडे, विजय थोरवत, संजयभाऊ सावंत, अभिषेक शिंपी, नौशादभाई बुडडेखान, गौरव देशपांडे, शरीफ खेडेकर, संभाजी इंजल, मारुती मोरे, जितेंद्र शेलार, गौरव देशपांडे, ओंकार मद्याळकर, चंद्रकांत ठाकूर, महेश कुरुणकर आदींसह महिला, युवा तसेच सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार आनंदा कुंभार यांनी मानले.

