अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरवर बंदी

हेरवाड कन्या विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समितीचा आदर्शवत निर्णय

हेरवाड : प्रतिनिधी
डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट हे शिक्षणाचे महत्त्वाचे साधन बनले असले, तरी त्याचा अतिरेक विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीवर परिणाम करत असल्याची जाणीव हेरवाड येथील कन्या विद्या मंदिर शाळेने कृतीतून करून दिली आहे. आजकाल मुले लहानसहान प्रश्नांसाठी थेट गुगलवर अवलंबून राहत आहेत, त्यामुळे त्यांची स्वतःची विचार करण्याची क्षमता आणि कल्पनाशक्ती कमी होत चालली आहे. शिक्षकांनी मुलांसमोर आदर्श ठेवणे गरजेचे आहे. जर शिक्षक स्वतः मोबाईलपासून दूर राहिले, तरच मुले पुस्तकांकडे वळतील, या विचारातून शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शिक्षकांच्या वर्गातील मोबाईल वापरावर निर्बंध घालण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमजान नदाफ यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, अध्यापन सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांनी आपले मोबाईल ‘स्टाफ रूम’मध्ये जमा करायचे आहेत. केवळ शैक्षणिक संदर्भासाठी अत्यावश्यक असल्यासच मोबाईल वापरण्यास मुभा असेल. आपत्कालीन परिस्थितीत मुख्याध्यापकांमार्फत संपर्काची व्यवस्था करण्यात आली आहे.
या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्व-विचाराची सवय वाढवणे. एखादा प्रश्न पडला की तत्काळ गुगल सर्च करण्याऐवजी पुस्तक उघडणे, शिक्षकांना विचारणे, मित्रांशी चर्चा करणे आणि स्वतः उत्तर शोधण्याची प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते. यामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, चिंतनशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो.
ग्रामस्थ आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, हा निर्णय संपूर्ण शिरोळ तालुक्यातील शाळांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिक्षकांनीही सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा बदल आवश्यक असल्याचे मान्य केले आहे.

हेरवाडच्या कन्या विद्या मंदिरने घेतलेला हा ‘डिजिटल संयम’चा निर्णय केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण तालुक्याने आदर्श म्हणून स्वीकारण्याची वेळ आता आली आहे.

आजकाल मुले लहानसहान प्रश्नांसाठी थेट गुगलवर अवलंबून राहत आहेत, ज्यामुळे त्यांची स्वतःची विचार करण्याची क्षमता आणि कल्पनाशक्ती कमी होत चालली आहे. विद्यार्थी आपल्या आई-वडिलांबरोबर आपल्या गुरुचे अनुकरण करतात त्यामुळे शिक्षक स्वतः मोबाईलपासून दूर राहिले, तरच मुले पुस्तकांकडे वळतील. हा निर्णय तालुक्यातील इतर शाळेत देखील व्हावा.

-रमजान नदाफ, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती