हेरवाड येथे मराठा समाज सांस्कृतिक हॉल पायाभरणी शुभारंभ संपन्न
हेरवाड : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात विकासकामांची गती कायम ठेवत प्रत्येक समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सांस्कृतिक हॉल उभारणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी, हेरवाड गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली असून भविष्यातही निधी कमी पडू दिला जाणार नाही. मराठा समाजाचा हा सांस्कृतिक हॉल समाज एकत्र आणणारा आणि विकासाला चालना देणारा ठरेल, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

हेरवाड येथे २० लाख रुपयांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून मराठा समाज सांस्कृतिक हॉलच्या पायाभरणीचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला, यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते.
याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना प्रत्येक समाजाचाही विकास समानतेने झाला पाहिजे, हा आमचा ठाम दृष्टिकोन आहे. केवळ रस्ते, पाणीपुरवठा विविध विकास कामे उभारणे एवढाच विकास नसून समाजाला एकत्र येण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
याच भावनेतून विविध समाजांसाठी सांस्कृतिक हॉल उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. या हॉलच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल. समाजातील युवकांना दिशा मिळेल, महिलांना संधी निर्माण होतील आणि एकोप्याची भावना अधिक दृढ होईल.
प्रत्येक समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र केवळ शासनाच्या मदतीवर न राहता समाजानेही आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. एकजूट, नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या बळावरच शिरोळ तालुका विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्रद्धा गायकवाड, पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे, सरपंच रेखा जाधव, मराठा समाजाचे अध्यक्ष बंडू घोलप, सुनील माळी, माजी सरपंच सुरगोंडा पाटील, दिलीप पाटील यांच्यासह ग्राम पंचायतीचे सदस्य, गावातील पदाधिकारी व मराठा समाजाचे बांधव मोठे संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य भरत पवार यांनी केले. आभार मस्के यांनी मानले.