दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ केल्याबद्दल सत्कार

कोल्हापूर : प्रतिनिधी-
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ केल्याबद्दल गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांचा गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांच्या हस्ते सत्कार गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व संस्था प्रतिनिधी उपस्थितीत होते. गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपया आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, दूध संस्था कर्मचारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत करत चेअरमन व संचालक मंडळाचा गौरव केला.
दुध उत्पादक हाच गोकुळचा खरा पाया : चेअरमन मुश्रीफ
दुघ उत्पादक हाच गोकुळचा खरा पाया आहे असे यावेळी गोकुळ चेअरमन नाविद मुश्रीफ म्हणाले. तर दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती साधणे हेच संघाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. करण्यात आलेली दरवाढ निश्चितच उत्पादकांच्या आर्थिक विकासाला चालना देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी वर्ग यांचा संघाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असून संघाच्या विविध योजना, अनुदाने आणि उपक्रमांची माहिती प्रत्येक दूध उत्पादका पर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कर्मचारी वर्गाने प्रभावीपणे पार पाडावी असे आवाहनही केले. दूध संकलन वाढीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी सध्या वाढत्या उन्हाळ्याचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होत असल्याचे नमूद केले. उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी, आहार व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि आरोग्य विषयक सूचना याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट होणार नाही आणि उत्पादकांचे नुकसान टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, बाळासो खाडे, युवराज पाटील, संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश जाधव, तानाजी गुरव, सरदार देसाई, संजय पानारी, मंगेश बेडकळ, रामचंद्र चौगले, शिवाजी शिंदे, सूनिल विभूते, संघटनेचे व दूध संस्था प्रतिनिधी कर्मचारी उपस्थित होते.