![]()
खरीप पिके पेरण्यास संधीच मिळाली नाही

आजरा : हसन तकीलदार
यावर्षी साधारणपणे 12 मे पासून पावसाची न थांबता संततधार हजेरी आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी तसेच खरीप पिके पेरण्यास संधीच मिळाली नाही. भाताची तरवे, नाचण्याची ल्हवे,भुईमूग, सोयाबीन, ज्वारी यासारखी पिके घेताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना सरपंच परिषदेने दिले आहे.
आजरा तालुक्यात भात, नाचणी, भुईमूग, मिरची, सोयाबीन यासारखी पिके घेतली जातात. यावर्षी मे पासून पावसाने दमदार सुरवात केल्याने व उसंत न दिल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पेरणी नगण्य आहे. भात, नाचणा,भुईमूग,सोयाबीन, ज्वारी यासारख्या पिकांची शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बियाणे पेरणीविना पडून आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांची उगवण कमी झाली आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे बियाणे कुजून गेली. त्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. सद्यस्थितीला माहे मे, जून आणि जुलैमध्ये पावसाने घातलेल्या थैमानाने शेतकऱ्यांना पेरण्या करणे अशक्य झाले. अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊन ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे.
शेतकऱ्यांच्या रोजी रोटीचा प्रश्नही निर्माण होणार आहे. सद्यस्थितीच्या हंगामाचा आढावा घेऊन शासनाने आजरा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी कोल्हापूर, कृषिमंत्री आणि पालकमंत्री यांनाही देण्यात आल्या. यावेळी जी. एम. पाटील (जिल्हाध्यक्ष ), पांडुरंग तारगल्ले (तालुकाध्यक्ष ), प्रियांका जाधव (तालुकाध्यक्षा ), युवराज पाटील (कार्याध्यक्ष ), समीक्षा देसाई (कार्याध्यक्षा), विलास जोशीलकर (उपाध्यक्ष ), रत्नप्रभा भुतुर्ले (उपाध्यक्षा ), धनाजी दळवी, लहू वास्कर, अनिल पाटील, पांडुरंग खवरे, वैषाली गुरव, सुनील बागवे, संकेत सावंत, वसंत कोंडूस्कर, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.