![]()
पेहलगाम पर्यटकांवर भ्याड हल्ल्याचा तुर्केवाडी येथे निषेध
हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली
चंदगड / तातोबा गावडा
पेहलगाम येथे पर्यटकांवर आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तुर्केवाडी येथे निषेध नोंदवण्यात आला. तर हल्ल्यात मृत झालेल्यांना मेणबत्ती प्रोजेक्ट करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा आवारात मेणबती प्रज्वलित करून हल्ल्यातील मृताना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. गावातील आजी माजी सैनिक बांधवांच्या नेतृत्वात दहशतवादाविरोधात जोरदार घोषणाबजी करत निषेध व्यक्त केला. या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवाद संपवण्याची अपेक्षा व्यक्त केली. हा हल्ला केवळ काश्मीरवर नसून संपूर्ण देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून त्याचा योग्य तो समाचार भारताकडून नक्की घेतला जाईल. आज ज्या निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले आहेत, त्यांची काय चूक होती? त्याच्यावर असा भ्याड हल्ला करणे ही मर्दानगी नसून याला इंडियन आर्मी जशास तसे उत्तर देईल असा संताप माजी सैनिक महादेव निवगिरे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी तुर्केवाडी येथील मुस्लिम बांधवांनी देखील सहभागी होत जोरदार निषेध व्यक्त केला. यावेळी आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष प्रकाश खोत तसेच त्यांचे सर्व सहकारी, मुस्लिम जमात अध्यक्ष गुलाब शेख, पोलीस पाटील माधुरी कांबळे, जानबा चौगुले, अशोक ओऊळकर, निस्सार शेख, अमृत दोरूगडे, ईश्वर चौगुले, महेश बसापुरे यांच्यासह गावातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ, तरुण आणि आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


