![]()
सार्वजनिक बांधकाम विभाग जागे व्हा
चंदगड : प्रतिनिधी

५२० बळी घेणारा बेळगाव-वेंगुर्ला रस्ता अजून किती बळी घेणार? सार्वजनिक बांधकाम विभाग जागे व्हा… जागे व्हा..! अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेळगांव वेंगुर्ला या आंतरराज्य रस्त्यासाठी अनोखे आंदोलन केले. या रस्त्यावर गेली अनेक वर्षे डांबरच पडलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात अनेक खड्डे पडून अपघात होतात. ज्यात अनेक जीव गेले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करते. याच खड्ड्यांमुळे मांडेदुर्ग येथील शिवांजली शहापूरकर या महिलेचा मृत्यू झाला. त्याची आठवण व्हावी आणि किमान बांधकाम विभागाला आतातरी जाग यावी यासाठी श्रद्धांजलीचा बोर्ड लावून बांधकाम विभागाच्या कामाचा निषेध व्यक्त करत स्वाभिमानीकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. आता तरी या रस्त्याची पुनर्बांधणी व्हावी आणि पावसाळ्यात सातत्याने खड्डे भरून अपघातवार आळा घालावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली.
बेळगाव-वेंगुर्ला हा राजमार्ग शिनोळीपासून महाराष्ट्र राज्यातून जातो. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असून सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या आठ वर्षापासून डांबरच टाकलेले नाही. अथवा रस्त्याचे मजबुतीकरण देखील केलेले नाही. परिणामी या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात खड्डे पडतात. यामुळे अनेक निरपराध लोकांचा अपघातामध्ये जीव जात आहे. २००५ पासून अपघातामध्ये ५२० लोकांचा जीव गेला आहे. तर २० जून रोजी शिनोळीजवळ रस्त्यावरील खड्यामुळे झालेल्या अपघातामध्ये मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील भगिनीचा १० जुलै रोजी मृत्यू झाला. त्यांच्या दोन लहान मुलांना आईची माया कोण देणार? तसेच चंदगड आगाराच्या एस.टी. बसच्या अपघातामध्ये चंदगडचे चालक लक्ष्मण हळदणकर यांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी कुणाची? या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून निरपराध जीव जात आहेत. तरी बांधकाम विभागाने यामध्ये तत्काळ लक्ष घालून रस्त्याच्या पुनर्बाधणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा आणि पावसाळ्यात रस्त्यावर झालेले खड्डे सातत्याने भरावेत. जेणेकरून निरपराध लोक मारल्याचे पाप आपल्या अधिकाऱ्यांच्या माथी बसणार नाही. याबाबत त्वरित कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे.
अन्यता होणाऱ्या जनतेच्या रोषास आपण सर्वस्वी जबाबदार असाल असे निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच लवकरात लवकर यावर कार्यवाही व्हावी अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर प्रा. दीपक पाटील (जिल्हा उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना), गोपाळ गावडे, गजानन राजगोळकर, नरसू पाटील, श्रीनाथ माडूळकर, अभिजित पाटील, अशोक पाटील, वसंत पाटील, अजित गावडे, अर्जुन मरणहोळकर यांच्या सह्या आहेत.