शक्तीपीठ हा विकासाचा महामार्ग असल्याने तो चंदगड विधानसभेतून जावा : आमदार शिवाजीराव पाटील 

Loading

गडहिंग्लजमध्ये शक्ती पीठ महामार्गाचे जोरदार समर्थन  

गडहिंग्लज : तातोबा गावडा

 शक्तीपीठ हा विकासाचा महामार्ग असल्याने तो चंदगड विधानसभेतून जावा अशी मागणी यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली. भाजपतर्फे शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या पदयात्रेत ते बोलत होते. चंदगड-गडहिंग्लज आजरा तालुक्यातून हा मार्ग जावा, अशी मागणी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना दिलेल्या निवेदनातून केली. पाटील म्हणाले, नेत्यांच्या फक्त पाकीट संस्कृतीमुळे आजपर्यंत आपल्या भागाचा विकास झालेला नाही. आम्हाला विकास हवा, आम्हाला रस्ता हवा. या शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा असा विकासाचा कॉरीडोअर होणार असून त्यामुळे विकासाला चालना मिळेल. या रस्त्याच्या माध्यमातून पर्यटनाला वाव मिळेल. त्यामुळे औद्योगिक विकासाची संधी उपलब्ध होईल. त्यातून रोजगार निर्माण होतील. त्यामुळेच गडहिंग्लज विभागासह चंदगड विधानसभा मतदारसंघ विकासासाठी शक्तिपीठ आवश्यक आहे. तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, त्याची दखल त्यांनी घेतली आहे. आम्ही शेतक-यांची मुलं आहोत. त्यामुळे यासंदर्भात आपण नक्कीच शेतक-यांशीही विचारविनिमय करणार आहोत. त्यातून शेतक-यांचा नक्कीच पाठींबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणा-या माजी खासदार स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यावर घणाघाती टिका केली. आजपर्यंत केवळ शेतक-यांच्या नावाने राजकारण करून त्यांनी तोडपाणी करण्याचे काम केले. त्यांच्या मतदारसंघात त्यांना कोणी विचारत नाही. त्यांचेच सहकारी आज त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी आता चांगल्या प्रवाहात आले आहेत, बाहेरच्यांनी येऊन त्यांची दिशाभूल करून नये. राजू शेट्टींचा काळ संपला आहे. त्यांची हालत ‘एक हाणा पण, नेता म्हणा’ अशी झाली असल्याचा टोला पाटील यांनी हाणला.
‘देवाभाऊ-शिवाभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है।’ शक्तीपीठ झालाच पाहिजे या घोषणांनी गडहिंग्लजमध्ये शक्तीपीठ महामार्गाचे जोरदार समर्थ करण्यात आले. महात्मा बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रा सुरु झाली. यावेळी शेतकरी सातबारा हातात घेवून मोर्चात सहभागी झाले. यावेळी यावेळी माजी मंत्री भरमू पाटील, अशोक चराटी, नामदेव पाटील, शांताराम पाटील, सचिन बल्लाळ,प्रा. किसनराव कुराडे,दीपक पाटील, संतोष तेली, गिरिजादेवी शिंदे, भारती जाधव, विजय कडूकर, अनिल शिवनगेकर, प्रीतम कापसे, एल. टी. नवलाज यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. किसनराव कुराडे यांनीही सहभागी होत या महामार्गाला पाठींबा दिला.दसरा चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेची सांगता झाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *