![]()
चंदगड : प्रतिनिधी –

यंदा पावसाने मे महिन्यात सुरुवात केल्याने प्रशासनाला ताम्रपर्णी नदीतील गाळ काढणीस पुरेसा कालावधी मिळाला नाही. पण पावसाळा संपल्यानंतर लगेचच गाळ काढून कोवाड बाजारपेठेला पूरमुक्त करू, असे आश्वासन आमदार शिवाजी पाटील दिले. शुक्रवारी जलसंपदा विभागासह कोवाड येथील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी जनतेला त्रास झालेला मला खपणार नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. आमदार शिवाजी पाटील यांनी अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
तालुक्यातील ही मोठी बाजारपेठ असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना पुरातून बाहेर काढू असा शब्द मी व्यापाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे शासकीय मान्यता व त्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून कोवाडवासीयांना या पुरातून बाहेर काढा असे त्यांनी सांगितले. गाळ काढणीच्या कामाची प्रकिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्षात राबवू,असे कार्यकारी अभियंता शिंदे यांनी सांगितले.