जयसिंगपूर पालिकेच्या फुगीर बजेटला शिरोळ तालुका विकास आघाडीचा विरोध

पक्षप्रतोद संजय पाटील कोथळीकर यांच्यासह विरोधी आघाडीच्या नगरसेवकांची कागदावर लढाई सुरू

जयसिंगपूर : प्रतिनिधी

  जयसिंगपूर पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाला शिरोळ तालुका विकास आघाडीच्या संजय पाटील कोथळीकर, संतोष जाधव,अनिता कोळेकर, रंगराव पवार, पंकज गुरव, स्वीकृत नगरसेवक गुंडाप्पा पवार यांनी विरोध दर्शवला. तसे लेखी म्हणणे आणि सूचना पीठासन अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना सादर केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्प हा फुगीर दाखवण्यात आल्याचे मत मांडून हा विरोध दर्शविला. प्रत्येक विभागवार आणि हेडव्हाइस धरण्यात आलेला अंदाजित खर्च आणि गेल्या आठ महिन्यातील खर्च यामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचे या लेखी म्हणण्यामध्ये नमूद आहे. पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी लेखी म्हणणे सादर करावे अशी सूचना आघाडीने केली. मात्र बहुमताच्या जोरावर सत्तारूढ गटाने बजेट मंजूर केले त्यास शिरोळ तालुका विकास आघाडीने विरोध केला.

 नगरसेवक संजय पाटील कोथळीकर यांनी बायोगॅस देखभाल दुरुस्तीसाठी केलेली तरतूद कमी करण्यात यावी अशी मागणी केली. तर नगरोत्थान बाबतचा मुद्दाही त्यांनी लक्षवेधी बनवला त्याबाबतची वाढीव तरतूद कमी करावी अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत भुयारी गटारी योजना यावर झालेला खर्च आणि होणारा खर्च याची विचारणा करीत त्यासाठीची ही तरतूद कमी करण्यात यावी असे त्यांनी हरकत घेऊन सुचित केले. तर नगरसेवक संतोष जाधव यांनी घंटागाडी बाबतची आणि गटार नाले साफ करण्याबाबतची तसेच घनकचरा व्यवस्थापन व रेल्वे ब्रिज, छत्रपती शाहू महाराज, जयसिंग महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरण, या मुद्यांसह अनेक मुद्द्यांचा वापर करीत अर्थसंकल्पास विरोध नोंदवला आहे. तर नगरसेवक पंकज गुरव यांनी हातपंप दुरुस्ती पाणीपुरवठा साहित्य त्याचबरोबर पालिकेच्या कामासाठी भाड्याने घेण्यात येत असलेल्या जेसीबी समयंत्रणांचा खर्च, शहरातील शौचालयांची, रस्त्यांची दुरुस्ती यावरील खर्च याला विरोध दर्शवत माहिती मागितली आहे. तर नगरसेवक रंगराव पवार यांनी बायोगॅस देखभाल दुरुस्ती या विषयासह शहरात मोकाट पिसाळलेली कुत्री आणि जनावरांच्या निर्बिजीकरण यावर होणारा खर्च योग्य आहे का असा सवाल उपस्थित करीत औषध फवारणी धूर फवारणी यावर होणाऱ्या खर्चाचाही खुलासा मागितला आहे. तसेच सिमेंट पाईप खरेदी आणि त्या बसवणे साठीचा अंदाजीत खर्च खुलासेवार माहिती मागितली आहे.

एकूणच यंदाचा अर्थसंकल्प हा फुगीर दिसत असल्याचा आरोप शिरोळ तालुका विकास आघाडीने केल्याचे दिसत आहे. आता सत्तारूढ पालिका यास काय प्रत्युत्तर देते किंवा नाही हे अनुभवणे शहरवासीयांसाठी रंजक ठरणार आहे.