मुस्लिम समाजाचे छत्रपती शिवरायांच्या घराण्याची थेट सलोख्याच्या संबंध : पैगंबर शेख

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांच्यापासूनच मुस्लिम समाजाचे छत्रपती घराण्याशी जिव्हाळ्याचे व सलोख्याचे संबंध होते. शहाजी व शरीफजी ही दोन नावे त्याचे प्रतीक आहेत. पन्हाळा पावनखिंड लढाईत प्रतापराव गुर्जर सोबत लढताना सिद्धी हिलालचा पुत्र सिद्धी वाहवहा यांचे शहीद होणे व आग्र्याहून सुटका होताना मदारी म्हेतर यांच्या योगदानाचा इतिहास का मांडला जात नाही. वारकरी संत शेख महंमद यांना मालोजीराजांनी पाच एकर जमीन वतन म्हणून दिली होती. या हा सर्व प्रवास तेव्हापासून सुरू आहे असे स्पष्ट प्रतिपादन पैगंबर शेख यांनी .व्याख्यानात केले.डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते.
‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या गाण्यातल्या सात जणांपैकी एक असलेला सिद्धी हिलाल वीर मावळा मराठा होता की नाही? या शहीद झालेल्या मुस्लिमाला तुम्ही मराठा मानणार आहात की नाही? असा शेकडो सवाल टाकून पैगंबर शेख म्हणाले, खोटा आणि अर्धवट इतिहास सांगून द्वेष पसरविण्यापेक्षा खरा आणि संपूर्ण इतिहास का सांगितला जात नाही. इतिहासातील अनेक अपरिचित दाखले देत त्यांनी इतिहासातील हिंदू मुस्लिम सलोख्याची पाने उलगडून दाखवली.अकबराने नाण्यावर राम-सीतेची प्रतिमा वापरणे, टिपू सुलताने स्वतःच्या अंगठीवर राम हे शब्द कोरणे, अलीकडच्या काळात शाहीर अमर शेखाने छत्रपती शिवरायावर पोवाडा रचने अशा उदाहरणांनी सलोखा अधोरेखित करत त्यांनी समाजासमोर या गोष्टी पुन्हा पुन्हा आणल्या पाहिजेत असे आग्रही प्रतिपादन केले. ‘नको मटण- हवे शिक्षण’ या घोषणे द्वारे आर्थिक कुर्बानी ची संकल्पना व त्यातून साठ लाख रुपयाची शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना वाटणे,बुरखा मुक्ती, स्त्री शिक्षण आदी गोष्टींच मुस्लिम समाजात पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून राबविण्याचे सांगून पैगंबर शेख यांनी मुस्लिमांसाठी संविधान हेच शरीयत असले पाहिजे असे ठासून सांगितले.
समाज प्रबोधनाचा हेतू ठेवून अनेकांत एज्युकेशन सोसायटी जयसिंगपूर स्थानिक समिती जयसिंगपूर कॉलेज वाकोळे कुटुंबीयांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या व्याख्यानात डॉ.महावीर अक्कोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वक्ते पैगंबर शेख यांचा सत्कार कॉलेज स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे यांच्या हस्ते करण्यात आला.तर प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कल्याणी अक्कोळे हिने आभार मानले. दोन दिवसाच्या या व्याख्यानमालेला जयसिंगपूर- कुरुंदवाड-शिरोळ परिसरातील जाणकार श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.