शिरोळ तालुक्यातील तिन्ही पालिकांच्या निवडणुकीत “बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार : आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा टोला

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी-

शिरोळ तालुक्यातील तिन्ही पालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी, इंडिया आघाडी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी पक्ष आणि संघटना संघटितपणे लढवणार असून यंदा पालिकांच्या निवडणुकीत “बिन आवाजाचा बॉम्ब फुटेल” असा टोला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी लगावला. जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावणार असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, दत्तू उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे, राज्यसंघटक चंगेजखान पठाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, अनिल यादव,पृथ्वीराज यादव, माजी नगरसेवक सर्जेराव पवार, युनूस डांगे, चंद्रकांत जाधव घुणकीकर,नितीन बागे, अशोक कोळेकर,गुंडाप्पा पवार,कॉम्रेड रघुनाथ देशिंगे, युवानेते संतोष जाधव,माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासने, विश्वजित कांबळे,आदी प्रमुख उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून निवडणूका रखडल्या असून सुप्रिम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे निवडणूक होत आहे असे आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट करीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही दोन चाके असून गेल्या काही वर्षापासून निवडणुका न झाल्याने प्रशासनात अनियमितता असून मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप केला.

दरम्यान देशातील तसेच राज्यातील वातावरण भ्रष्टाचारी तसेच जमिनी हडपणारे झाले असून निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या शपथपत्रात सत्तेतील लोकांच्या प्रॉपर्टीत वाढ झाल्याचे दिसून येईल. असेही आम.पाटील यावेळी म्हणाले. तर तसेच अनेक जमिनी हडपल्या जात असून महिन्याला आपली नावे आपल्या जमिनीला आहेत की नाही हे बघा असा इशाराही त्यांनी दिला. शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर तिन्ही गावात एकत्रित आघाडी म्हणून निवडूक लढविणार असून काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर तर काही ठिकाणी आघाडी म्हणून लढाई होईल असे त्यांनी सांगितले.