![]()
दोन्ही बंधूंमध्ये समन्वय : कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे : कोट्यावधीची विकास कामे अंतिम टप्प्यात : अनेक कामे प्रगतीपथावर

जयसिंगपूर : प्रतिनिधी –
गेली पाच वर्ष आणि सध्या राज्याच्या सत्तेत विराजमान असलेले माजी आरोग्य राज्यमंत्री आणि शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जयसिंगपूर नगरीच्या विकासाचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची संपूर्ण फौज जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज असून नगराध्यक्ष पदासाठी आग्रही असणारी विरोधकांची फौज अजूनही स्पष्ट दिसत नाही.येणाऱ्या काळात ही फौज जरी तयार झाली तरी आमदार डॉ. यड्रावकरांचा चक्रव्यूह भेदणार? असा गहन प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत येत आहे. राज्यसत्तेत विराजमान झाल्यापासून डॉ.यड्रावकरानी जयसिंगपूर साठीच नव्हे तर शिरोळ तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. या शहरात तर ते सत्तेत आल्यापासून भली मोठी विकास कामे होत आहेत. त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील सर्वच गावांमध्ये त्यांचे असलेले कार्यकर्त्यांचे जाळे आणि लोकप्रियता लक्षात घेता गत वेळी राजर्षी शाहू आघाडी डॉ.यड्रावकर यांच्या नियोजनामुळे पालिकेत सत्तेवर आली. मात्र नगराध्यक्ष पद हे काबीज करण्यात विरोधी आघाडीला यश आले होते. डॉ.यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून या शहरात सुद्धा कार्यकर्त्यांचे जबरदस्त जाळे तयार झाले आहे. दरम्यान जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह काही प्रभागात रस्सीखेच असली तरी सर्व उमेदवार राजर्षी शाहू आघाडीचे निश्चित झाले असून विरोधकांची काहीही हालचाल स्पष्ट होत नसल्यामुळे यंदाची जयसिंगपूर पालिका डॉ. यड्रावकर यांच्या ताब्यात येण्याची चिन्हे सध्या तरी स्पष्ट दिसून येत आहेत. राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार कोणकोणत्या प्रभागातून निवडणूक लढणार यावर फक्त शिक्का मोर्तब होणे बाकी आहे.

निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून भली मोठी कुमक डॉ.यड्रावकर यांनी तयार ठेवली असून संजय पाटील यड्रावकर आणि डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात असलेला समन्वय लक्षात घेता सध्या तरी जयसिंगपूर पालिकेसाठी सकारात्मक वातावरण दिसत आहे. दुसरीकडे विरोधकांची मात्र अजून जुळवा जुळवच सुरू असल्याचे दिसते. यादरम्यान नेत्यांची मने जरी एक झाली तर त्यांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार काय हा एक भला मोठा प्रश्न आहे. त्यातच गेली पाच वर्ष जयसिंगपूर पालिकेवर प्रशासक असून या कालावधीत या शहराला नगरसेवक ही नाही आणि नगराध्यक्षही नाही अशी परिस्थिती जनतेने अनुभवली आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांची समस्या त्यांनी मांडायची कोणासमोर हा एक गहन प्रश्न उपस्थित झाला होता. तरीही या शहराच्या विकासासाठी अनेक कामांना डॉ. यड्रावकर यांनी तडीस नेण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला आहे. या शहरांमध्ये शासकीय विश्रामग्रह,छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व म्युझियम, दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज स्टेडियम, वडार समाज बांधवांसाठी सभागृह, शहरातील सर्व रस्त्यांवर एल.इ.डी. पथदिवे,मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह,बगीचा याचबरोबर बरीच वर्षे प्रलंबित असलेला झोपडपट्टी वासीयांचा प्रॉपर्टी कार्ड चा प्रश्न ही सर्व कामे डॉ. यड्रावकर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सत्तेच्या काळात झाली आहेत. त्याबरोबरच सध्या या शहरालगत मनोविकार रुग्णालय, शहरात सर्वत्र भुयारी गटार योजना, पालिकेची नवी इमारत बांधकाम अशी दखल घेण्यायोग्य अनेक कामे प्रगतीपथावर आहेत तर काही अंतिम टप्प्यात आहेत.
शरद सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अख्या शिरोळ तालुक्यात असलेले डॉ.यड्रावकर यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आणि लहान बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरात असलेला जनसंवाद लक्षात घेता या निवडणुकीच्या निमित्ताने एक जबरदस्त असा चक्रव्यूह यड्रावकर बंधूना तयार करणे शक्य झाले असून हा चक्रव्यूह आता विरोधक भेदणार काय? या सवाला बरोबरच हा चक्रव्यूह भेदणे शक्य नाही असा अंदाजही आत्मविश्वासाने डॉ. यड्रावकर यांचे कार्यकर्ते आणि जनमानसातून व्यक्त होत आहे.
