नगरपरिषद निवडणूकीचे वारे आणि भानामतीचा प्रकार

Loading

चंदेरी नगरीत खळबळ : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

हुपरी : प्रतिनिधी

सध्या हुपरी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहेत.गावातील राजकीय वातावरण तापलेले असताना चंदेरी नगरीतील वाळवेकर नगर परिसरात प्रभाग क्रमांक १० मध्ये दिनांक २४ ऑक्टोबर रोजी भानामतीचा प्रकार उघड झाल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.कृष्णा संजय पोतदार यांच्या दिवाळीच्या शुभेच्छांचा डिजिटल बोर्ड लावण्यात आलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.विविध संभाव्य उमेदवारांकडून दिवाळीच्या शुभेच्छांसाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल फ्लेक्स आणि एलईडी बोर्ड लावण्यात आले आहेत.अशाच एका डिजिटल बोर्डखाली अज्ञात व्यक्तींकडून भानामतीचा प्रकार करण्यात आल्याचे स्थानिकांना लक्षात आल्यानंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली.घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मनसेचे तालुकाध्यक्ष दौलत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. नेमका हा प्रकार कोणाच्या सूचनेवरून करण्यात आला आणि त्यामागे उद्देश काय होता, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना राजकीय वातावरणात तणाव निर्माण करू शकतात, अशी चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे. स्थानिकांनी पोलिस प्रशासनाला गावात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.या घटनेमुळे शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या हुपरी गावात एकच खळबळ माजली असून,पुढील तपास हुपरी पोलिसांकडून सुरू आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *