![]()
पार्टीच्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला दगड

जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील गल्ली क्रमांक १३ येथे बुधवार दि.22 रोजी सुनील पाथरवट याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका खुनामुळे जयसिंगपूर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उदगाव-अंकली दरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रात आज रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ३५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
मयत तरुणाचे नाव लखन सुरेश घावट उर्फ बागडी (वय ३५) असे असून, प्राथमिक माहितीनुसार त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लखन घावट हा आपल्या काही मित्रांसोबत उदगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळील नदी पात्रात पार्टीसाठी गेला होता. यादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एकाने लखनच्या डोक्यावर दगडाने प्राणघातक हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.पण शहरात मात्र भीतीचे वातावरण आहे. भय इथले संपत नाही अशी म्हणायची वेळ आली आहे.