सर न्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकल्याचा आणि सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध

Loading

आजरा परिवर्तनवादी पक्ष,संघटनेचे तहसीलदारांना निवेदन 

आजरा : प्रतिनिधी

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यादिशेने बूट फेकण्याची केलेली कृती तसेच अभियंता,शास्त्रज्ञ आणि लडाख मधील सामाजिक व शैक्षणिक चळवळीचे प्रणेते
सोनम वांगचूक यांना केलेली अटक या घटनांचा निषेध करीत सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकणाऱ्या व्यक्तिवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा आणि त्याला तातडीने अटक करावी तसेच सोनम वांगचूक यांना केलेली अटक ही चुकीची असून त्यांची तात्काळ सुटका करावी अशा मागणीचे निवेदन परिवर्तनवादी पक्ष,संघटना,आजरा यांचेमार्फत आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपिठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरु असताना वकील राकेश किशोर याने पिठाच्या दिशेने बूट फेकला.सुरक्षारक्षक त्याला पकडून घेऊन जात असताना त्याने “सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्तान” अशी घोषणा दिली.हा देश भारतीय संविधानाच्या पायावर उभा असून धर्मनिरपेक्षता हे त्यातील महत्वाचा गाभा आहे.याउलट घडलेला प्रकार हा केवळ सरन्यायाधीशांचा अपमान नसून तो भारतीय संविधान,न्यायव्यवस्था आणि लोकशाहीचा अपमान आहे.राकेश किशोर याची कृती अत्यंत निंदनीयअसून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला कठोर शासन झाले पाहिजे.याबरोबरच लडाख मधील अभियंता आणि शास्त्रज्ञ असलेले सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचे प्रणेते सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरवून केलेली अटक ही लोकशाही विरोधी आहे.सोनम वांगचूक यांचा इतिहास पहिला असता त्यांनी केलेले कार्य हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे असेच आहे.विविध भाषिक समूहातून आलेल्या मुलांसाठी प्रमाण भाषा ही शिक्षणातील अडसर ठरते.हे ओळखून त्यांनी भाषा,शिक्षण आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन करून लडाखमध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळ उभी केली.त्यांनी देशाला दिलेले योगदान अतुलनीय आहे आणि अशा व्यक्तीला अटक करणे ही घटना लोकशाही विरोधी असून कायदा धाब्यावर बसवणारी आहे.एक प्रकारची हुकूमशाहीच आहे अशी टीकाही निवेदनामध्ये केली आहे.आज देशातील परिस्थिती पाहता देशात सरकारला प्रश्न विचारणाऱ्या,चुकीच्या निर्णयावर आवाज उठवणाऱ्या व्यक्तींचा,संघटनांचा आवाज सत्तेच्या आधारे दडपला जात असून त्यांना अर्बन नक्षल किंवा देशद्रोही ठरवून अटक होत आहे.त्यामुळे या दोन्ही घटनांचा निषेध यावेळी करण्यात आला. तर राकेश किशोरला तात्काळ अटक व्हावी आणि सोनम वांगचूक यांची ताबडतोब सुटका व्हावी अशा मागणीचे निवेदन आजरा तहसीलदार यांना परिवर्तनवादी पक्ष,संघटना यांचे मार्फत देण्यात आले. या निवेदनावर कॉ. संपत देसाई,प्रा.डॉ.नवनाथ शिंदे, कॉ.शांताराम पाटील, कॉ.संजय घाटगे,प्रकाश मोरूस्कर,काशिनाथ मोरे, दशरथ घुरे, नारायण भडांगे आदींच्या सह्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *