![]()
एक दिवसाचा दिला पगार; शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तू रवाना
जयसिंगपूर : प्रतिनिधी

मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘ गुरुदत्त शुगर्स च्या’ कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला असून, यातून घेण्यात आलेले शालेय साहित्य व जीवनाश्यक वस्तू धाराशिव जिल्ह्यातील भूम, ढगे चिंचपुर , वाल्हा , हिवरडा, भव्हाणवाडी, वाशी , केळेवाडी व सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथिल १००० पूरग्रस्त कुटुंबीयांना गावांमध्ये जाऊन वाटप करण्यात आले.तसेच अनेक वाड्यांमध्ये पावसामुळे पूल, रस्ते वाहून गेल्यामुळे तेथिल लोकांना मदत पोचली नव्हती. त्याठिकाणी गुरुदत्त शुगर्स चे कर्मचाऱ्यांनी जाऊन त्यांना मदत पोहच करून आधार दिला .
साखर,तांदुळ, गव्हु, हरभरा व तुरडाळ, आंघोळीचे , धुण्याचे व भांडी घासण्याचे साबण, सोनपापडी, बिस्किट , टोस्ट आदी बेकरी पदार्थ या जीवनावश्यक वस्तूसह वह्या, पेन व पेन्सिल बॉक्स आदी शालेय साहित्य एकत्र करून १ हजार पॅकेटस् तयार करण्यात आले. ही मदत कारखान्याचे चेअरमन श्री माधवराव घाटगे , सर्व संचालक व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाकडे पाठविण्यात आली.
यावेळी बोलताना चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले, महापूर व कोरोना सारख्या आपत्तीमध्ये व इतर सामाजिक कार्यात गुरुदत्त शुगर्स नेहमीच सर्वात अग्रभागी राहिला आहे.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ‘ गुरुदत्त शुगर्स’ कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्त लोकांना देऊन माणुसकीचे कार्य केले आहे. कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केवळ पगार, बोनस किंवा आर्थिक लाभापुरते मर्यादित राहून कधी काम केलेले नाही. तर समाजाच्या हितासाठी आणि गरजू लोकांसाठी सदैव योगदान दिले असल्याचे श्री. घाटगे यांनी सांगितले. तसेच धाराशिव जिल्ह्यातील गरजू पूरग्रस्तांना साहित्य पोहच करण्यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंह घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले .