![]()
उलाढाल 14 कोटींच्या आसपास : 10% लाभांश देण्याचा निर्णय

आजरा : प्रतिनिधी
सर्वात जुनी पतसंस्था जवाहर नागरी सहकारी पत संस्थेची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. संस्थेच्या पैगंबरवासी सुलेमानशेठ दिडबाग सभागृहात नुकतीच ही सभा झाली. येथील मुस्लिम समाजाची अर्थवाहिनी ही संस्था असून अहवाल सालात 29 लाखाचा नफा झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष इकबाल इब्राहिम शेख यांनी संगितले. गतवर्षी संस्थेची उलाढाल 14 कोटींच्या आसपास असून सभासदांना 10% लाभांश देण्याचा निर्णय यावेळी घेणेत आला. संस्था स्थापनेपासून ते आजतागायत सर्वात जास्त नफा व वार्षिक उलाढाल झाली असे संचालक समीर चांद (सर) यावेळी म्हणाले. चोख, प्रगतशील व पारदर्शक कारभाराबद्दल अमानुल्ला आगलावे यांनी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
यावेळी अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक बशीरअहमद काकतिकर यांनी केले. सभासदांनी प्रश्न विचारले. तर कैय्युम बुडडेखान यांनी नातेवाईकांची कर्ज वसुली प्रधान्याने करणेबाबत सूचना मांडली. देवदास पाचवडेकर यांनी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन पात्र कर्मचारी भरती तातडीने करावी अशी सूचना केली. मुनीर बुडडेखान यांनी पिग्मी कलेक्शन वाढण्याच्या व उत्तम जाधव यांनी लाभांश मध्ये वाढ करावी असे मत मांडले. त्याचप्रमाणे संस्थेचे कार्यक्षेत्र आजरा शहरांपुरते मर्यादित वरून कोल्हापूर जिल्हा करण्याचा ठराव देखील मांडण्यात आला.
अहवाल सालात दिवंगत झालेले संस्थेचे सभासद, नातेवाईक, ठेवीदार तसेच सामाजिक राजकीय नेते, शहीद जवान आदींना श्रद्धांजलीचा ठराव असिफ दरवाजकर यांनी मांडला. आभार संचालक तौसिफ आगा यांनी मानले. यावेळी असिफ सोनेखान, असलम लमतुरे, इलियास तकीलदार, इस्माईल बेपारी (सर), सौ. शबनम मुल्ला, सौ. रुखसाना नसरदी व सभासद उपस्थित होते.