![]()
तालुक्याची अर्थवाहिनी : महत्वाचे विषय मंजूर : गोवा येथे नवी शाखा होणार

आजरा : प्रतिनिधी
तालुक्याची अर्थवाहिनी, सर्वसामान्यापासून सर्वांना आर्थिक गरज पूरवणारी आजऱ्यातील दि आजरा अर्बन को-ऑपरेटीव्ह (मल्टीस्टेट)बँकेची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीत पार पडली. यावेळी संपलेल्या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामकाजाचा अहवाल व लेखापरीक्षक यांनी तपासलेला ताळेबंद, नफा -तोटा पत्रक, सन 2023-24 सालच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे, अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चाला मंजुरी देणे, सन 2025-26वर्षासाठीच्या अंदाज पत्रकास मान्यता देणे, समवर्ती हिशोब तपासणीस नेमणुकीचा अधिकार संचालक मंडळास देणे, एकरकमी कर्ज परतफेड व इतर योजनेंतर्गत व्याज व इतर वसुली खर्चात सूट, पोटनियम दुरुस्तीस मान्यता इ. महत्वाच्या विषयावर ही वार्षिक सभा झाली. गोवा येथे नवीन शाखा सुरु करावी असे सूचित केल्यानंतर अशोकअण्णा यांनी गोवा येथे नवीन शाखा सुरु करणेत येईल असे आश्वासन दिले. तर यावेळी तुळसाप्पा पोवार या शेतकरी सभासदाने आपल्या रांगड्या आणि गावठी भाषेत प्रश्न मांडला आणि सूचना केली की, जादातर सभासद हे ग्रामीण भागातील शेतकरी असून त्यांना जीव धोक्यात घालून शेतात राबवे लागते, हत्ती, वाघ, गवे, अशा श्वापद पासून नुकसान होते, तेव्हा अशा सभासदांना बँकेने नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी अशी मागणी केली. तर दिवाकर नलवडे यांच्या प्रशांवर अशोकअण्णांनी बँकेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन चार मजली शानदार इमारत उभारणार असल्याची घोषणा केली.
यावेळी 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचे उपस्थित संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर विशेष सत्कार म्हणून सुधीर (बापू ) कुंभार यांची भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल चेअरमन अशोकआण्णा चराटी यांच्या हस्ते तर अनिकेत चराटी यांची भाजपा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल व्हा. चेअरमन संजय चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार संचालक विलास नाईक यांनी मानले.
स्वागत, प्रास्ताविक बँकेचे चेअरमन अशोकअण्णा चराटी यांनी केले. बँकेच्या 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंद आणि नफा तोटा पत्रके तसेच बँकेच्या व्यवसायाने आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. बँकेच्या एकूण व्यवसाय 10•80 टक्क्यानी वाढून ठेवीमध्ये 14•09 टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. तर कर्जामध्ये सुद्धा 6•03 टक्क्यांची वाढ झाली असून या आर्थिक वर्षात रु.385 लाख इतके एन.पी.ए.कर्ज वसुली केलेने आर्थिक वर्षाअखेरीस रु.2042 लाख इतके एन.पी.ए.कमी करण्यात यश आल्याचे सांगितले. रिझर्व बँकेच्या निकषाचे पालन करीत रु. 25 लाखापर्यंतच्या कर्ज खात्यामध्ये व्यावसाय हा बँकेच्या 62•61% इतका आहे. बँकेने कर्जावरील रिबेट योजना सुरु केली असून ग्राहकांनी कर्जे वेळेत परतफेड करून रिबेट योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तर प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजना तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई यांची कर्ज योजना सुरु केली असून या योजनांचा लाभ घ्यावा असेही आवाहन अशोकअण्णा यांनी केले.
सभा नोटीस, विषयपत्रिका वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले. सभासदांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देत सभासदांच्या शंकांचे निरसनही केले. यावेळी माजी संचालक आर. डी. पाटील यांनी यावर्षी नफा जास्त असलेले 10% ऐवजी 12% लाभांश सभासदांना द्यावा अशी मागणी केली. मशिनरी व वाहनासाठी कर्जे देताना योग्य तारण घेऊन कर्जे द्यावीत असेही मत त्यांनी मांडले. सभासद किरण तानवडे यांनी 1000 कोटी ठेविंचा टप्पा पार झालेबद्दल बँक व्यवस्थापन व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
यावेळी सुरेश डांग, डॉ. दीपक सातोस्कर, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ प्रणिता केसरकर, सौ अस्मिता सबनीस, श्रीमती शैला टोपले, सूर्यकांत भोईटे, सुनील मगदूम, किरण पाटील, ऍड सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे, माजी संचालक हसन शेख, डॉ अंजनी देशपांडे आदिसह सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
