![]()
वाढदिवस उत्साहात : विकासाचे नवे संकल्प जाहीर

चंदगड : प्रतिनिधी
विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. असंख्य शुभेच्छुक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या कर्तव्यदक्ष कर्तव्य तत्पर अशा लोकप्रतिनिधीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसानिमित्त चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी विकासाचे नवे संकल्प यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी जाहीर केले. वीज प्रकल्प, पर्यटन विकास, रोजगार निर्मिती अशा विविध घोषणांसह शक्तिपीठाला पाठिंबा, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्वाही यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली. वाढदिवसाचे औचित्य साधून विकासाचे संकल्प आणि जनतेशी थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम सर्वसामान्य जनतेसाठी आश्वासक आणि प्रभावी ठरला.
स्वराज मल्टीपर्पज हॉल, पाटणे फाटा येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. अनेक महत्त्वाचे विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. “शक्तीपीठांमुळे प्रेरणा मिळते आणि त्यामुळेच विकासकार्य शक्य होते. त्यामुळे शक्तिपीठाला विरोध करणाऱ्यांना विरोध करत आपण शक्तिपीठांच्या बाजूने ठामपणे उभा राहणार आहोत.” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यात वीज निर्मिती प्रकल्प उभारून स्थानिक रोजगारनिर्मिती करण्याचा संकल्प व्यक्त केला.
तालुक्यातील गड, ऐतिहासिक स्थळे आणि रस्त्यांचा विकास करून पर्यटन व्यवसायास चालना दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, आगामी गोकुळ निवडणुकीत नव्या ओळखीने कार्यरत राहून सहकार क्षेत्रात नवे योगदान देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दौलत साखर कारखाना परिसरातील शेतकरी व कामगारांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पावले उचलली जाणार असून, निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेले विकासाचे वचन पूर्णत्वास नेणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमू आणा पाटील .संग्राम अडकूरकर, मायाप्पा पाटील, रमाकांत कोडूसकर (सीमाभाग), नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपिठावर आमदार शिवाजी पाटील यांच्या कन्या स्मिता व शिवांजली व भाची भारती जाधव, दिपक पाटील, ज्योती पाटील, सचिन बलाळ, भावकू गुरव, रविंद्र बांदिवडेकर, शांताराम पाटील, नामदेव पाटील, शामराव बेनके, लक्ष्मण गावडे, विशाल बल्लाळ, ओमकार सुळेभावकर, अमेय सबनीस आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक करून सूत्रसंचालन अनिल शिवनगेकर यांनी केले.