![]()
आमदार शिवाजीराव पाटील यांचा पाठपुरावा
चंदगड / प्रतिनिधी
तालुक्यातील 18 धनगर वाड्यांवर आणि वस्तीवर पोहोचण्यासाठी वाहनांना रस्ता नाही यास अनेक समस्यांकडे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे लक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी वेधले. जिल्हा प्रशासन या वाड्यावर त्यांवर अगदी पायपीट करून पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. त्यानुसार करून चाचणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन चंदगड तालुक्यातील धनगर वाड्यापर्यंत पोहोचले. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांना जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे थेट चालतच प्रशासन धनगर वाड्यांवर पोहोचले.
काही दिवसांपूर्वी विधान भवनामध्ये चंदगड तालुक्यातील १८ धनगरवाड्यांची समस्या आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडली होती. या धनगरवाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या व्यथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहचवून लवकरात लवकर या धनगरवाड्यांवर आवश्यक त्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्परतेने आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती आमदार पाटील यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. आवश्यक ते आदेश संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दिले. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी चंदगड तालुक्यातील धनगरवाड्यांचा दौरा केला. तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उपस्थित राहून येथील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, मोबाईल नेटवर्क यांसारख्या अनेक समस्या जिल्हाधिकारी येडगे यांच्या निदर्शनास आमदार शिवाजीराव पाटील यांनी आणून दिल्या. जिल्हाधिकारी येडगे यांनी मोठ्या तत्परतेने येथील स्थानिक युवक, महिला व शाळकरी मुलांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्हा अधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी, तहसीलदार व सर्व शासकीय अधिकाऱ्यांचेही कौतुक होत आहे. पावसाळ्यात येथील परिस्थिती आणखीनच भयावह होत असल्याने शासनाने लवकरात लवकर येथील विकास कामांना प्राधान्य द्यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण व ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान आमदार शिवाजीराव पाटील यांनी पाठपुरावा केला यांचेही अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

