![]()
शेतकऱ्यांबरोबर दुग्ध व्यवसायिकांसाठी मार्गदर्शन मेळावा संपन्न
आजरा / प्रतिनिधी


शिवसेना उबाठा तर्फे आजरा तालुक्यातील शेतकरी वर्गाबरोबर दुग्धव्यावसायिकासाठी जे. पी. नाईक चैतन्य हॉल आजरा येथे मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास शेतकऱ्यांसह दुग्ध व्यवसायिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. मेळाव्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. थायलंडचे वाणिज्य सल्लागार, गोकुळचे तज्ञ संचालक, अनेक पारितोषिकांनी सन्मानित, 27 देशात जागतिक स्तरावर काम केलेले, दुग्धव्यवसायावर अभ्यास केलेले डॉ. चेतन नरके हे प्रमुख वक्ते होते.
पशुसंवर्धन, दुधातील व्यवसायिकता, जनावरांचे जातीवंत वाण, दूधवाढीसाठीचे उपाय, जनावरांचे संगोपन आदिविषयी परिपूर्ण माहिती देत डॉ. नरके यांनी उपस्थितांची मने जिंकली.
प्रारंभी डॉ. नरके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद भोपळे यांनी केले. प्रा. सुनील शिंत्रे यांनी मेळाव्याचे उद्देश स्पष्ट केले. हा भाग डोंगराळ असल्याने शेतीबरोबर काजू प्रकल्प, पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसाय करणे गरजेचे आहे. आपला देश अर्थव्यवस्थेत 4 थ्या क्रमांकावर असला तरी 80%लोकांना फुकट राशन द्यावे लागते, लाडकी बहीण सारखी योजना राबवावी लागते. याचा अर्थ सर्वसामान्य माणूस आजही अर्थसंकल्पातुन वंचित आहे. ठराविक भांडवलदारांच्या पथ्याला पडून त्यांचाच उद्धार झालेचा दिसून येत आहे. तळागाळातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर यासाठी दुग्धव्यावसाय सुधारून त्यात व्यवसायिकता आणणे गरजेचे आहे असे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणाले.
गोकुळचे अधिकारी महेश कोले यांनी डॉ. चेतन नरके यांच्याविषयी माहिती दिली. तर डॉ. चेतन नरके यांनी मार्गदर्शन करताना जनावरांचे आरोग्य, जनावरांचे खाद्य, जातीवंत जनावरे याबाबत माहिती दिली. आदर्श गोठा कसा असावा, जनावरांचे संगोपन कसे करावे, 100%मादी जन्मास घालण्याच्या पद्धतीबाबत सांगताना जास्तीत जास्त गर्भधारणा करून जातीवंत जनावरे आपल्याच गोठ्यात कशा पद्धतीने तयार होतील याकडे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याने लक्ष दिले पाहिजे. असे त्यांनी सांगितले. आजरा तालुक्यातील दूध धंद्याला चांगला वाव आहे. भारताचा दूध उत्पादनात जगात पहिला क्रमांक आहे. देशात 238 मिलीयन मे. टन. दुधाचे उत्पादन होते. पुढच्या 20 ते 30 वर्षात आपल्या देशाने 658 मिलीयन मे. टन.दूध उत्पादन करण्याचे मानस केलेले आहे. प्रति जनावरामागे जेवढे लिटर दूध वाढवता येईल तितका नफा अपेक्षित आहे. यासाठी दूध वाढीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी विषद केले.
अंजनाताई रेडेकर यांनीही गोकुळ विषयी माहिती दिली. गोकुळचा भागात रूट सुरु करणार, गोकुळने 61वर्षे पूर्ण करीत 18लाख ते 19लाख लि. दूध संकलनाचा टप्पा पार पाडला आहे. गोकुळने लाभांश ही वाढविला आहे. त्याचप्रमाणे गोकुळच्या ज्या ज्या महत्वकांशी योजना आहेत त्यांचा पूर्णपणे लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी राज्य पातळीवर शूटिंग स्पर्धेत यश मिळवून राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या महमदजैद मकानदार व श्रेयन बिरजे या विद्यार्थ्यांचा डॉ. चेतन नरके यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. धनाजी राणे, के. व्ही. येसणे, कॉ. संपत देसाई, इब्राहिम लाडजी, ओमकार माद्याळकर, चंद्रकांत व्हराकटे, दिनेश कांबळे, महादेव गुरव, संजय सावंत, विश्वास चव्हाण, विजय केसरकर, महेश पाटील, किशोर मटकर, हुसेन तकीलदार, आनंदा कुंभार, उपकृषिधिकारी, तसेच तालुक्यातील दुग्धव्यवसायिक शेतकरी व गोकुळचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय येसादे यांनी आभार मानले.

