संबंधित व्यक्ती व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेट कोल्हापूर जिल्हा अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती व्यापक आंदोलन छेडणार
कोल्हापूर : प्रतिनिधी -

अनुसूचित जातीच्या (एस.सी.)आरक्षणाचा गैरवापर करून खोट्या जातप्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढविल्या जात असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित व्यक्ती व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीने केली आहे.याबाबत समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षांना निवेदन सादर केले. आरक्षणाच्या सुविधेचा गैरवापर होत असून या समस्येकडे लक्षवेध करीत कोल्हापूर जिल्हा अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे धाव घेतली असून त्यांना याबाबत दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करून साकडे घातले आहे. याप्रकरणामुळे अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर गदा येत असून समाजात तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.योग्यवेळी निष्पक्ष चौकशी न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला.
दरम्यान,या निवेदनावेळी उत्तम कांबळे,डी.जी.भास्कर,दुर्वास कदम,शिवाजीराव कवाळे,प्रा.शहाजी कांबळे,सुभाष देसाई,बाळासाहेब भोसले,रमेश जाधव,जनार्दन गायकवाड,रामनाथ मांडरे,रामचंद्र कांबळे,भाऊसाहेब काळे,सुधाकर रणदिवे,सतीश माळगे,देवानंद कांबळे,जयसिंग जाधव,शिवाजीराव कांबळे,सोमनाथ बोर्डराव,रमेश रत्नाकर,डॉ.किशोर सडोलीकर,सुरेश राजशील,संदेश माने,विनोद शिंदे,कुंडलिक कांबळे,अशोक पाडगे आदी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरगोंडा बसगोंडा पाटील (महेश पाटील) यांचा हास्यास्पद दावा ! पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार दरगोंडा बसगोंडा पाटील (महेश पाटील)यांनी अनुसूचित जातीतील लिंगडेर या जातीचे प्रमाणपत्र सादरक रून निवडणूक लढवली आहे आणि ते विजयी झाले आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रात “लिंगडेर”ही जात अस्तित्वात नसल्याचा दावा या शिष्टमंडळाने केला असून संबंधिताच्या कुटुंबीयांच्या पूर्वीच्या नोंदींमध्ये या लिंगडेर या जातीचा कोणताही उल्लेख नसल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे. समितीच्या म्हणण्यानुसार,संबंधित व्यक्ती लिंगायत समाजातीलअसून लिंगायत हा धर्म/पंथ असून स्वतंत्र जात नाही.तसेच त्यांनी यापूर्वी विविध निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून लढविल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे,दि.३० मार्च२०२२ रोजी उपविभागीय कार्यालय,इचलकरंजी येथून त्यांनी इतर मागासवर्ग(तेली)या जातीचे प्रमाणपत्र घेतल्याची नोंद असून,त्यानंतर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केल्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयास्पद ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक छाननी दरम्यान २०१२ सालचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घरात सापडल्याचा दावा त्यांनी केला असून,हा दावा हास्यास्पद असल्याचे समितीचे मत आहे.एका व्यक्तीकडे वेगवेगळ्या प्रवर्गातील दोन जात प्रमाणपत्रे असणे ही अत्यंत गंभीर बाब असून जर शासकीय नोंदींचा गैरवापर, दिशाभूल किंवा फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले, तर संबंधित व्यक्तींसह संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम, २००० तसेच इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आली आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आहे. इचलकरंजीचे अशोक स्वामी आणि गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश महादेव तुरचतमठ यांचे प्रमाणपत्र खोटे !
इचलकरंजी महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील अलका अशोक स्वामी आणि गडहिंग्लज नगरपालिकेचे नगराध्यक्ष महेश महादेव तुरचतमठ यांनीही खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला असून वरील सर्व खोटी प्रमाणपत्रे वापरणाऱ्यांवर प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारावा अशी मागणी करण्यात आली आहे.

