![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी २१ कोटी रुपये निधीच्या माध्यमातून रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. पेयजल योजना, गॅस पाईपलाईन तसेच भुयारी गटर योजनेच्या कामांमुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. मात्र आता या सर्व रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आले असून शहरातील सर्व अंतर्गत रस्ते पक्के व सुस्थितीत होणार आहेत.
नगरपालिका निवडणुकीदरम्यान राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीने जयसिंगपूरकरांना निवडून आल्यानंतर सर्वप्रथम शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले होते. निवडणुकीनंतर त्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी करत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी पेयजल योजना, गॅस पाईपलाईन आणि भुयारी गटर योजना राबविण्यात आल्या. या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांदरम्यान रस्त्यांची तोडफोड होणे अपरिहार्य होते. मात्र काही विरोधकांनी याच मुद्द्यावरून विनाकारण राजकारण करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तथापि, जयसिंगपूरची जनता विकासाभिमुख असल्याने अशा अपप्रचाराला बळी न पडता राजर्षी शाहू विकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत भरघोस विजय दिला, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्या असून, त्यानंतर रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या काही महिन्यांत जयसिंगपूर शहरातील प्रत्येक अंतर्गत रस्ता पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासकामांची गुणवत्ता व वेळेवर पूर्तता यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या रस्ते विकास कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार असून नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच व्यापारी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही कामे उपयुक्त ठरणार आहेत.
प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, आम्ही निवडणुकीदरम्यान सांगितले होते की यड्रावकर यांचा शब्द म्हणजे स्टॅम्प आहे, दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर न बोलता वैयक्तिक पातळीवर आरोप केले. मात्र जयसिंगपूर शहरातील जनता सुज्ञ आहे. जनता विकासाबरोबर असल्याने राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय झाला आहे. यापुढेही जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नूतन नगरसेवक अर्जुन देशमुख, बजरंग खामकर, पराग पाटील, महेश कलकुटगी, सचिन निटवे,सचिन चौगुले, गिरमल कोळी, लक्ष्मण गोसावी, अशोक मळगे, नगरसेविका अनुराधा आडके, तेजश्री पाटील, रूपाली बंडगर, मीनल नांद्रेकर, शकुंतला मछले, स्वाती मादनाईक, उज्वला वाघवेकर, तब्बूसम फरास, गीता भोसले, अर्चना आडगाणे, लता गाडेकर यांच्यासह मा.नगराध्यक्ष संभाजी मोरे, शितल गतारे,राजेंद्र नांद्रेकर, मिलिंद शिंदे,मिलिंद भिडे, शैलेश आडके, सागर मादनाईक,रमेश यळगुडकर, प्रवीण बलदवा, विजय मानगावे, रुस्तुम मुजावर, उत्तम वागवेकर,अजित उपाध्ये, राहुल पाटील, सागर आडगाणे, रवी पवार, शेखर गाडेकर, संतोष भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

