![]()
तालुक्यातील ५ गावात २० कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीतून पूर संरक्षक भिंत व नदी घाट बांधकामाचा शुभारंभ
जयसिंगपूर :
सन २००५ पासून सतत महापुराचा सामना करणाऱ्या शिरोळ तालुक्याला कायमस्वरूपी संरक्षण मिळावे, या उद्देशाने पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणीचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला असून, भविष्यात शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त गावांमध्येही अशाच स्वरूपाची कामे राबवून तालुक्याला महापुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे ठाम प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील बुबनाळ, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद व गौरवाड या गावांमध्ये सुमारे २१ कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीतून पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणीच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
आमदार यड्रावकर म्हणाले की, शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. रस्ते, गटारी यांसारखी विकासकामे नियमितपणे होतच राहतात; मात्र पूर संरक्षक भिंत व नदीघाट बांधणी ही कामे दीर्घकाळासाठी असतात. त्यामुळे ही कामे दर्जेदार व टिकाऊ व्हावीत, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
सन २००५ पासून वारंवार येणाऱ्या महापुरामुळे शिरोळ तालुक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीला कायमचा आळा घालण्यासाठी पूरबाधित गावांमध्ये पूर संरक्षक भिंती तसेच महापुरामुळे उद्ध्वस्त झालेले नदीघाट पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रारंभी बुबनाळ, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद व गौरवाड या गावांमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, शिरोळ तालुक्यातील उर्वरित पूरग्रस्त गावांमध्येही लवकरच अशीच कामे पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
वारंवार महापुराचा फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.
पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंद्रकांत यादव यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले की, पूर संरक्षक भिंत व नदीघाट बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. वेळोवेळी त्यांनी मंत्रालयात यासाठी बैठका लावून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. या नदीच्या माध्यमातून या गावांना पुरापासून संरक्षण मिळेल तसेच गेले अनेक वर्षापासून रखडलेले नदी घाट बांधकाम पूर्ण होईल. पाटबंधारे विभागाच्या वतीने सदरचे काम दर्जेदार होण्यासाठी आणि वर्षानुवर्षी टिकावे यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, औरवाड या गावी सुद्धा पूर संरक्षक भिंत व घाट बांधणीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे, लवकरच या कामाला सुद्धा सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शेतकरी नेते सावकार मादनाईक, धनाजीराव जगदाळे, दादेपाशा पटेल, सुकुमार किनिंगे, श्रेणिक मालगावे, विद्याधर मरजे, सुरेश शहापुरे, बापूसो ऐनापुरे, आलास येथे सरपंच सचिन दानोळे, उपसरपंच सोनाली कोळी, फजलेअली पाटील, गोविंद कोल्हापूरे, विश्राम कोळी, रफिक साहेबअली, इलियास पटेल, गणपती मगदूम,कवठेगुलंद येथे सरपंच संगीता शिंदे, आनंदा कुम्मे, मल्लाप्पा चौगुले, बाबासाहेब पाटील, उपसरपंच गुरुपाद केटगाळे, राजेश डवरी, आदिनाथ आरबाळे, राजू रावण, योगेश जगताप मराठा समाजाचे अध्यक्ष सम्राट जगताप, अमर शिंदे, शिवसेनेच्या दिपाली चंदुगडे, विनोद जगताप,
शेडशाळ येथे सरपंच सुनील संकपाळ,माजी सरपंच किरण संकपाळ, उपसरपंच रोहिणी कोल्हापूरे,वर्धमान कल्याणी,लखन लाड, माजी उपसरपंच फैय्याज अहमद सोलापूरे, ग्रामपंचायत अधिकारी सुनील वाघमोडे, नितिन नाईक, ग्राम विकास सोसायटी चेअरमन अविनाश तकडे, विजय कोळी, साहेब पाथरवट,कुंतिनात उपाध्ये, कल्लाप्पा कांबळे,आण्णाप्पा नाईक, वसंत पवार, अनिल साजणे, प्रथमेश तकडे ,सनाउल्ला पठाण,दिलीप जगनाडे, गौरवाड येथे सरपंच निलोफर मोमीन, विजय कुंभोजे, मौजम कोल्हापुरे, आदिनाथ आरबाळे, रावसाहेब आरबळे, राजू रावण, राजू गडगले, आप्पासाहेब गडगले, सुरेश बन्ने, असलम खुतबुद्दीन मुल्ला गौतम निंबाळकर, बाबालाल चिंचवाडकर यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
