शाहू विकास आघाडीच्या समर्थनार्थ जयसिंगपुरात उसळला जनसागर

शाहू विकास आघाडीच्या समर्थनार्थ जयसिंगपुरात उसळला जनसागर

Loading

नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसादात जयसिंगपूरमध्ये शिट्टीचा आवाज घुमला

जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरात राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मोटरसायकल रॅलीत अक्षरशः जनसागर उसळला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, सावकर मादनाईक, अमरसिंह निकम, मिलिंद भिडे, सतिश मलमे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅलीची भव्य सुरुवात झाली. जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील सर्व प्रमुख मार्ग, प्रभाग आणि नागरिकांच्या उपस्थितीने ही रॅली ऐतिहासिक ठरली. विशेष म्हणजे, सुमारे ५ हजार जयसिंगपूरकरांनी या रॅलीत स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला, ज्यामुळे रॅलीचा उत्साह आणि भव्यता अधिकच वाढली. शेकडो मोटरसायकलींचा सहभाग , कार्यकर्त्यांचे उत्साह आणि शहरभर दिसणारी जनसमर्थनाची लाट यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या रॅलीमुळे जयसिंगपूर शहरात सर्वदूर शिट्टीचा आवाज घुमला.
याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही ३८६ कोटींची विकासकामे केली आहेत. चाळीस वर्षे नागरिकांनी जपलेले स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे कार्य पूर्ण करण्याचे भाग्य आमच्या हातून लाभले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात करून नियोजित भीमसृष्टी लवकरच साकारणार आहे. शहरातील भुयारीगटार योजना, विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल, नगरपालिकेची सुसज्ज इमारत, शाहू स्टेडियम यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. विरोधकांकडे नागरिकांना दाखवण्याजोगे एकही विकास काम नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. तथापि, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, आमचा एकमेव हेतू जयसिंगपूरचा सातत्यपूर्ण विकास, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आमच्याबरोबर येत आहेत, हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे.
रॅलीदरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि सर्व प्रभागांमधील नगरसेवक पदाचे उमेदवार शहरातील नागरिकांना नमस्कार करून आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करत होते. शहरातील प्रत्येक प्रभागातून रॅली जात असताना नागरिकांनी उंचावलेल्या उत्साहाने आणि घोषणांनी उमेदवारांचे स्वागत केले. वाढता प्रतिसाद, तरुणाईचा सहभाग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला प्रचंड जनसमर्थन मिळाले असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासाची गंगा अखंडपणे वहात ठेवण्यासाठी नागरिकांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या प्रसंगी केले.
ही रॅली सिद्धेश्वर देवालय पटांगण पासून गल्ली नंबर ४ लक्ष्मी रोड पासून गल्ली नंबर १ रेल्वे स्टेशन रोड ने – गली नंबर ६ पासून यड्रावकार चेंबर्स हनुमान चौक राजीवगांधी नगर, बाळूमामा मंदिर पासून शहा पेट्रोल पंप रोड ने कोल्हापूर रोड वरून हेरवाडे कॉलनी बायपास रोड ते नांदणी नाका मेनरोड-मालती कापड दुकान पासून ओझा बिल्डिंग ते पटेल चौक – नवीन कोर्टा समोरून – शिवतिर्थ कोल्हापूर रोड ते नांदणी रोड ने नांदणी नाक्या पर्यंत -तेथून कोळी हॉस्पिटल पासून धम्मालय ते शिरोळ रोड ते रेल्वे स्टेशन रोड ते गली नंबर ४ व सिद्धेश्वर मंदिर जवळ या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.