![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
नृसिंहवाडी येथे गुरुवार, दि. 4 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली असून या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासन, देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही नृसिंहवाडी येथे होणारा दत्त जयंती सोहळा भाविकांच्या मोठ्या गर्दीत संपन्न होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ठीक ५ वाजता श्री दत्त मंदिरात होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
ग्रामपंचायत आणि श्री दत्त देवस्थान समितीने संयुक्तरित्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा, स्वच्छता, प्रकाशयोजना, शिस्तबद्ध रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, वाहन पार्किंग, वाहतूक नियंत्रण आदींचे नियोजन पूर्ण केले आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीत तहसीलदार अनिलकुमार हेळकर, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, सरपंच चेतन गवळी, ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी उत्सवाच्या तयारीची सविस्तर माहिती आमदार यड्रावकर यांच्यासमोर मांडली.
आमदार यड्रावकर यांनी विशेषतः वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर दिला. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, विशेषतः वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. पार्किंगसाठी वेगळ्या जागांची योजनाबद्ध रचना करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच परिसरात वैद्यकीय पथक सतत सज्ज ठेवण्यासही सांगितले. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.
बैठकीनंतर आमदार यड्रावकर यांनी श्री दत्त मंदिर परिसराची तसेच प्रमुख मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्ते, वीज व्यवस्था, तंबू, मंडप, बॅरिकेड्स, पाणी व्यवस्था या सर्व गोष्टींचा त्यांनी व्यक्तिगतपणे आढावा घेतला. नृसिंहवाडी हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे दत्त जयंतीसारख्या पवित्र उत्सवात येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देवस्थान समितीचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी देवस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व तयारीची माहिती बैठकीत उपस्थितांना दिली. मंदिरातील दिवसभराच्या पूजा, दर्शन व्यवस्था, रांग व्यवस्थापन, महाप्रसाद आयोजन, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आमदार यड्रावकर यांना सांगितली.
या आढावा बैठकीस सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे, विस्तार अधिकारी रविकांत कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. खटावकर, डॉ. पाटील, पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, अभिजीत जगदाळे, सागर धनवडे, अविनाश भोसले, विकास कदम, गुरू खोचरे, रमेश सुतार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान समितीचे कार्यकर्ते आणि विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

