शिवसृष्टी आणि नियोजित भीमसृष्टीमुळे जयसिंगपूरच्या सौंदर्यात भर : ॲड.संभाजीराजे नाईक

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

गेल्या ४० वर्षापासूनचे स्वप्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी जयसिंगपूर येथे साकारण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. आता शहरात ‘शिवसृष्टी’नंतर भव्य ‘भीमसृष्टी’ उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांचे जनकपिता जयसिंग महाराज आणि जयसिंगपूर शहराची स्थापना करणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम देखील पूर्णत्वास येत आहे. जयसिंगपूर शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभिमानाला नवी दिशा देणारा हा उपक्रम असून राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेली जयसिंगपूर नगरीला शिव – शाहू – फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जोपासला आहे, आणि शहराचा सर्वांगीण विकास केला आहे, असे मत ॲड. संभाजीराजे नाईक यांनी मांडले.
गेल्या ४० वर्षापासूनचे स्वप्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून झाली. रोज संध्याकाळी या परिसरात दिव्यांची लखलख आणि शिवछत्रपतींच्या मूर्तीचे तेज अधिकच खुलून दिसत आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी भारलेले शहर म्हणून जयसिंगपूरची ओळख निर्माण करणाऱ्या या कामाचे नागरिकांकडून मोठे स्वागत होत आहे.
सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मोठ्या उत्साहात जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. सर्व समाजबांधवांच्या सहभागातून झालेली ही मिरवणूक जयसिंगपूरच्या सामाजिक ऐक्याचा उत्कृष्ट नमुना ठरली. आता बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती आधुनिक सुशोभीकरण करून ‘भीमसृष्टी’ विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे नाईक यांनी सांगितले. शहरातील तरुण, विद्यार्थी, महिला मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
जयसिंगपूरमध्ये शिवाजी महाराज आणि आंबेडकर या दोन महापुरुषांच्या स्मारकांचे उभारणीकरण आणि सुशोभीकरण हे केवळ सौंदर्य नसून शहराच्या स्वाभिमानाशी जोडलेला मुद्दा आहे. एका बाजूला छत्रपतींचे पराक्रम, शौर्य आणि राज्यकारभाराचा आदर्श; तर दुसरीकडे बाबासाहेबांचे संविधान रक्षकत्व, समानता, सामाजिक न्याय यांचा संदेश या दोन्ही मूल्यांचा संगम शहराच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देईल, असे ॲड नाईक यांनी स्पष्ट केले.
‘भीमसृष्टी’ प्रकल्पात मुलांसाठी ज्ञानदालन, वाचनालय, प्रेरणादायी शिल्पसृष्टी, डिजिटल गॅलरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देणारे केंद्र अशा विविध उपक्रमांचा समावेश ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. शहरातील नागरिकांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारला जात आहे आणि जयसिंगपूरची ओळख पुढच्या पिढ्यांसाठी अधिक उज्ज्वल बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसृष्टी यशस्वीरीत्या उभी राहत असताना, आता नियोजित भीमसृष्टीमुळे शहराच्या संस्कृती, वारसा आणि सामाजिक ऐक्याला मजबुती मिळणार आहे. शिवजयंती, आंबेडकर जयंती, सामाजिक उपक्रम तसेच प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रम या दोन्ही ठिकाणी आयोजित करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
त्याचबरोबर जयसिंगपूर शहरात भुयारी गटरी योजना, नगरपालिकेची सुसज्ज देखणी इमारत, स्टेडियमची उभारणी, विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल यासह ३८६ कोटी रुपयांची विविध विकास कामे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली आहेत. जयसिंगपूर शहराचा विकास अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी नगरपालिका निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार संजय पाटील यड्रावकर व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे असल्याचे मत ॲड.संभाजी राजे नाईक यांनी मतदारांच्या पुढे मांडले.