इचलकरंजी : प्रतिनिधी

हवेतील वाढत्या आद्रतेमुळे ऊस आणि इतर पिकांवरही सध्या तांबेरा, लोकरी मावा व पानांवरील ठिपके या रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. हे रोखण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्या वतीने रोग व किडीचा प्रादुर्भावा रोखण्यासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी करुन दिली जात आहे.मे 2025 पासून सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचे प्रमाण अत्यल्प राहिलेले आहे. त्याच्या दुष्परिणामामुळे ऊस पिकाची वाढ समाधानकारक झाली नसल्याचे दिसून येते. या पिक परिस्थितीमुळे ऊस उत्पादन घटण्याच्या भितीने शेतकरी आणि कारखान्यांनमध्येही चिंतेचे वातावरण आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, ज्येष्ठ संचालक प्रकाशआण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार ऊस पिक वाढीसाठी गाळप हंगाम 2024-25 पासून ड्रोनद्वारे द्रवरूप खते व औषधे फवारणी योजना अत्यंत माफक दरात बिनव्याजी क्रेडीटवर चालू केलेली आहे. या योजनेस शेतकर्यांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे.ऊस पिकावरील सध्याच्या तांबेरा व लोकरी मावा नियंत्रणासाठी बुरशीनाशके व किटकनाशके उपलब्ध करून ड्रोनद्वारे फवारणीचे नियोजन केलेले आहे. तरी कारखान्याकडे गाळपासाठी ऊस नोंद दिलेल्या शेतकर्यांनी कारखान्याच्या नजीकच्या शेती सर्कल/गट ऑफीस किंवा शेती स्टाफ यांचेशी त्वरीत संपर्क साधून आपल्या ऊस पिकावरील तांबेरा व लोकरी मावा नियंत्रणासाठी कारखान्याच्या ड्रोन फवारणी योजनेचा शेतकरी बंधूनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे.
