दूध उत्पादकांच्या श्रमामुळे यश : गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन 

Loading

राधानगरी तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा संपन्न 

राधानगरी : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ” गोकुळ” ची यावर्षीची वार्षिक उलाढाल ४ हजार कोटी असून ५१२ कोटीच्या ठेवी आहेत. हे यश दूध उत्पादकांच्या श्रमांमुळे शक्य झाले असे प्रतिपादन संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.

दूध उद्योगाच्या क्षेत्रामध्ये अमूल दूध संघानंतर गोकुळ दूध संघाचे नाव विशेष सन्मानाने घेतले याचा अभिमान व्यक्त करीत त्यांनी गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून भविष्यातही हे प्रयत्न अधिक केले जातील असा विस्वास व्यक्त केला. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न राधानगरी तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा शनिवार दि.३० रोजी आनंद पॅलेस मंगल कार्यालय, शेळेवाडी ता.राधानगरी येथे चेअरमन मुश्रीफ अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते. 

संघाने २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असून, म्हैस दूध वाढीसाठी संघामार्फत विविध सेवा व सुविधा राबवल्या जातात. असे सांगून चेअरमन मुश्रीफ यांनी या सेवा सुविधांचा लाभ अधिकाधिक दूध उत्पादकांनी घ्यावा, असे आवाहन केले. यामुळे म्हैस दुधाचे प्रमाण आणखी वाढेल आणि दूध उत्पादकांना फायदा मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संघामार्फत येत्या काळात रेडी टू इट या प्रकारचा ओली व सुकी वैरण निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे जनावरांच्या पोषणाचा प्रश्न सुटेल आणि दूध उत्पादनात वाढ होईल. गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना १ रुपयामधील ८२ पैसे थेट दूध उत्पादकांच्या हाती देतो. त्यामुळे गोकुळ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा संघ असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. तर संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी गोकुळ ने नेहमीच दूध व्यवसायाला चालना देण्याचे काम केले असून गेल्या चार वर्षात अनेक सभासद हिताचे निर्णय घेतले आहेत असे बोलून राधानगरी तालुक्यातून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम योजना प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

यावेळी दूध संस्था प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. यावेळी म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ केलेबद्दल, इमारत अनुदान वाढ तसेच संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहानात वाढ केल्याबद्दल तसेच   उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटपही करण्यात आले.
प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले.

संचालक अभिजित तायशेटे यांनी स्वागत केले. संचालक किसन चौगुले यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, अधिकारी तसेच राधानगरी तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.संचालक राजेंद्र मोरे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *