![]()
चंदगड : प्रतिनिधी
येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने अत्यंत प्रभावी आणि माहितीपूर्ण असे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक अधिकारी प्रिया पाटील यांनी विद्यार्थ्यांना अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक नियमांची सखोल माहिती दिली. त्यांनी सिग्नलचे पालन, वाहनाच्या वेगावर नियंत्रण, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, तसेच वाहन चालविताना आवश्यक काळजी घेण्याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तरे दिली.


‘शंभर दिवस, शंभर शाळा’ या विशेष मोहिमेअंतर्गत राजेंद्र किरमटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वाहतुकीविषयी जनजागृती केली. सर्वांनी सामूहिकपणे रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेतली. यावेळी उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, परिवहन समिती अध्यक्ष जे. जी. पाटील, ज्येष्ठ अध्यापक व्ही. के. गावडे, टी. व्ही. खंदाळे, प्रकाश पाटील, सचिन पाटील, ओंकार पाटील उपस्थित होते. सुत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभार शरद हदगल यांनी मानले.