![]()
बॅलेट पेपरवर निवडणूक, खऱ्याखुऱ्या मतदानाचा लुटला आनंद


धामोड / प्रतिनिधी
विद्यार्थी हा शालेय जीवनापासूनच परिपूर्ण व्हावा, त्याचा शैक्षणिक पाया मजबूत करतांना त्याला भारतीय लोकशाहीतील एक स्तंभ असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती व्हावी, भविष्यात निवडूणकीला मतदान करावे लागणार असून त्यासाठी जनजागृती करण्याची गरजच भासणार नाही, म्हणून येथील श्री. शिवाजी हायस्कूल क ॥ तारळे ता. राधानगरी या शाळेत मुलांना निवडणूकीचे धडे देण्यात आले. विद्यालयात शालेय मंत्रीमंडळाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली.
भारतात लोकशाही असून ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक मतदान पद्धतीने निर्भय वातावरणात, निरपेक्षपणे घेण्यात येते. शाळेत देखील प्रत्येक वर्गात मंत्रीमंडळ असते. त्यात वेगवेगळे मंत्री असुन मुख्यमंत्री पद देखील असते. मतदान पेटीचा उपयोग करून विद्यालयातील सर्व मुला-मुलींनी मतदानाचा आनंद घेतला.शालेय विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया म्हणजे काय? आपला उमेदवार आपण कसा निवडतो? प्रचार यंत्रणा कशी राबविली जाते? अगदी निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्यापासून ते शेवटी निकाल जाहिर होण्यापर्यंतची ही प्रक्रिया मुलांना समजावी व भारताचे आदर्श नागरीक यातून घडावेत यासाठी हा निवडणूक कार्यक्रम घेतल्याचे जिमखाना प्रमुख श्री. शितोळे सर यांनी सांगितले. विशेष म्हणजे या निवडणूक कार्यक्रमात मतदार यादी प्रसिध्द करणे, मतपत्रिका छापणे, मतदान विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून प्रचार करणे, निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी निवड करणे, मतदान केंद्रात आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे, अगदी बोटाला निळी शाई लावण्यापासून ते मतपेटीत मतदान केलेली मतपत्रिका घडी करून टाकण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया मुलांनी अनुभवली.
या निवडणूकीचे विशेष म्हणजे ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली, एकही मतपत्रिका यात बाद गेलेली नाही. केंद्राध्यक्ष म्हणून बी.डी. ऱ्हायकर सर यांनी तर मतदान अधिकारी म्हणून इयत्ता ७ वीच्या श्रेया सुतार, रिया सणगर व आराध्या पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. शालेय मंत्रमंडळ निवडणूक २०२५-२६ या निवडणूक प्रक्रियेत ऋग्वेद राहूल शेलार या विद्यार्थ्याची शाळेचा मुख्यमंत्री तथा विध्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली़. विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून उत्कर्षा मानसिंग पाटील हिची निवड झाली. तसेच प्रत्येक वर्गासाठी वर्गप्रतिनिधी म्हणून ५ वी ते १० वी पर्यंत अनुक्रमे शौर्य आनंदा गुरव, शुभ्रा रविंद्र सुतार, वेदांत संदिप पाटील, अमेय उदयसिंह पाटील, वैष्णव विलास वागरे, आदिती आनंदा गुरव यांची निवड झाली.
यावेळी शाळेचे प्राचार्य एस. डी. कांबळे, जिमखाना प्रमुख तथा पर्यवेक्षक श्री. बी.पी. शितोळे, सहा. शिक्षक श्री. एस. व्ही कांबळे, सागर सिद, व्ही. बी. कोळी , सागर भिसे, संजय गुरव, सुभाष कदम, शिवूडकर मॅडम, विशाल डवर, विजय कांबळे, संभाजी पाटील, एम.डी. जाधव, भारती कांबळे, संदिप कांबळे, दत्ता पाटील यासह सर्व विध्यार्थी - विध्यार्थीनी उपस्थित होते.
वेगळा अनुभव मिळाला
मोठी माणसे कसे मतदान करतात हे शाळेतील सरांनी घेतलेल्या कार्यक्रमामुळे आम्हाला समजले. आम्हाला मतदान करताना खूप मजा वाटली. वेगळा अनुभव आम्हाला मिळाला.
- अमृता सचिन पाटील ( विद्यार्थिनी इयत्ता ७ वी )
आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आनंद
लहानपणापासून लोकशाहीचे धडे शाळेतच दिले तर विदयार्थी जागरूक नागरिक तयार होतील. लोकशाही सदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते. शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र शिकवलं जातं. पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र शिकवण्याचा प्रयोग करून आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आम्हाला आनंद होत असल्याचा प्राचार्य श्री. एस.डी.कांबळे यांनी सांगितले

