![]()
आजरा / हसन तकीलदार-
आजरा या शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून श्वान हैदोसाने आजरावासी पुरते हैरान झाले आहेत. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी लोकांना हैराण करीत आहेत. अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्याचबरोबर पाळीव जनावरांवर तसेच शेतकऱ्यांवर ही हल्ला करून कुत्र्यांनी शहराला हैराण करून सोडले आहे. तर कुत्र्यांचा हैदोस जनतेला सतावत आहे.


या समस्येकडे लक्षवेध करण्यासाठी अध्यापक समीर खेडेकर नजीर लमतुरे मुस्तकीम तकिलदार फिरोज मुल्ला इम्तियाज इंसानालकर मोहम्मद रसूल तगारे यांनी संयुक्तपणे आजारा नगरपंचायतीला निवेदन दिले. तर शिवसेना उभाठा जिल्हा प्रमुख संभाजी पाटील आणि तालुकाध्यक्ष युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली चक्क कुत्रा घेऊनच नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. याचा परिणाम म्हणून साधारणपणे दहा पंधरा कुत्री पकडण्याचे आणि त्यांना अन्यत्र सोडण्याचे देखाव्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. तर गेल्या वर्षी भटक्या कुत्र्यांना पकडून जोर सोडण्यात आले होते परंतु चार-पाच दिवसांपूर्वी मासोली तिट्याजवळ काही अज्ञातांनी गाडी भरून कुत्री आणून सोडल्याची चर्चा सुरू आहे. या भागातली कुत्री त्या भागात सोडणे आणि त्या भागातली कुत्री परत या भागात आणून सोडले असा कुत्री तस्करीचा प्रकार बंद करून या समस्येवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

