जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक जाणकार व्यक्तिमत्व संजय पाटील यड्रावकर यांची पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली.क्रिकेट क्षेत्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेताना क्रिकेट या खेळाबद्दल असलेली त्यांची आवड, जयसिंगपूर शहरात महाराष्ट्र शासन व जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले भव्य आणि अद्यावत असे स्टेडियम, राजर्षी शाहू स्टेडियम नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्टेडियमवर डे नाईट प्रकाश झोतातील अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर सातत्याने करत आहे.
एकूणच या सर्व कामाची नोंद घेऊन असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये संजय पाटील यड्रावकर यांची पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे,
संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील क्रिकेट खेळातील गुणवंत खेळाडूंना या पुढच्या काळात प्रेरणा व पाठबळ मिळणार आहे, त्यांना अनेक संधी उपलब्ध होतील
त्यामुळे या खेळात अनेक नवोदित खेळाडूंना आपल्या खेळाची चमक दाखवता येईल असेही क्रिकेट प्रेमी जनतेतून बोलले जात आहे.
दरम्यान, जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू महाराज स्टेडियमवर आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग – 2026 (PMPL-01) या क्रिकेट स्पर्धेला राजर्षी शाहू स्टेडिअमवर १ एप्रिल पासून उत्साहात सुरुवात झाली असून ५ एप्रिल पर्यंत या स्पर्धा डे – नाईट विद्युत प्रकाशझोतात संपन्न होत आहेत. पहिले बक्षिस २ लाख ५१ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १ लाख ५१ हजार तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी ७५ हजार व मॅन ऑफ टुर्नामेंट १० हजार, बेस्ट बॅस्टमन ५ हजार व बेस्ट बॉलरला ५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील एकूण १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर तसेच बेळगाव येथील संघांचा सहभाग स्पर्धेचे आकर्षण ठरत आहे. स्थानिक तसेच प्रादेशिक पातळीवरील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची ही मोठी संधी मिळत असून प्रेक्षकांमध्येही स्पर्धेबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जयसिंगपूर परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.
