![]()
गौरव माळी याची युथ खेलो इंडिया साठी निवड
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील श्री बाहुबली विद्यापीठ संचालित जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर व आक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजच्या विनायक अमोल काटकर या विद्यार्थ्याने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील 60 किलो वजनी गटामध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने वेटलिफ्टिंग मधील स्नॅच या प्रकारामध्ये 102 किलो व जर्क या प्रकारामध्ये 132 किलो असे एकूण 234 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
तसेच गौरव रवींद्र माळी या खेळाडूने 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने स्नॅच या प्रकारामध्ये 107 किलो व क्लीन अँड जर्क या प्रकारामध्ये 130 किलो असे एकूण 237 किलो वजन उचलून चौथा क्रमांक मिळविला. गौरव माळी याची युथ खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या दोन्ही यशस्वी खेळाडूंनी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या 67 व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये हे यश मिळवले. केंद्र शासनाच्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या स्पर्धेचे आयोजन आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी प्रत्येक राज्यातून व प्रत्येक केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येक वजनी गटामध्ये एक खेळाडू याप्रमाणे 30 खेळाडू सहभागी झाले होते. यशस्वी दोन्ही खेळाडूंना जनतारा शालेय समितीचे चेअरमन महावीर पाटील, नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर, मुख्याध्यापक दीपक वाडकर, पर्यवेक्षक विनोद मगदूम, प्रशिक्षक तथा क्रीडा विभागप्रमुख पद्मभूषण भरमगोंडा,अध्यापक-अध्यापिका व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, महामंत्री डी.सी. पाटील, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संचालक गोमटेश बेडगे व सर्व ट्रस्टी यांचे प्रोत्साहन मिळाले. या खेळाडूंचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
