कृष्णा नदीत विवाहितेची उडी घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अद्यापअस्पष्ट

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

    अंकली–उदगाव दरम्यानच्या कृष्णा नदीपात्रात मंगळवार दि. 13 रोजी दुपारी सुमारे 1.30 च्या सुमारास एका विवाहितेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.प्राजक्ता राहुल देसाई वय २४, रा.गावभाग, सांगली असे या विवाहितेचे नाव आहे.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता कडेगाव (जि.सांगली) येथील रहिवासी असून तिचे लग्न गावभाग सांगली येथील राहुल देसाई यांच्याशी झाले होते. त्यांच्या लग्नाला सुमारे 11 वर्षे झाली असून त्यांना चार वर्षांची व दीड वर्षांची अशा दोन मुली आहेत.

मंगळवारी सकाळी बाजारासाठी जाते, असे सांगून प्राजक्ता घरातून निघाली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने पती राहुल देसाई यांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान अंकली–उदगाव दरम्यान कृष्णा नदीपात्रात एका विवाहितेने उडी मारल्याची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे प्राजक्ताचा मोबाईल आढळून आला. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर प्राजक्ताने नदीत उडी मारल्याची खातरजमा झाली.

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर–सांगली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात शोधकार्य सुरू असून परिसरात नागरिकांची मोठी गर्दी केली होती.पुढील तपास पोलिस करत आहेत.