जयसिंगपूरात यड्रावकर बंधूंच्या पुढाकाराने रंगणार शूटिंग बॉलचा थरार

Loading

राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन विश्वसनीय सूत्रांकडून माहिती

जयसिंगपूर : डॉ. सुभाष सामंत

जयसिंगपूरच्या क्रीडा विश्वात गेली आठ वर्षे रखडलेली राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरू होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली असून, येत्या २५, २६ व २७ जानेवारी रोजी तीन दिवस ही स्पर्धा रंगणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

  कधीकाळी राज्यातील नामवंत खेळाडू घडवणारी ही स्पर्धा वर्षानुवर्षे केवळ घोषणांपुरती मर्यादित राहिली होती. त्याचा फटका स्थानिक युवक खेळाडूंना बसला होता.

दरम्यान, क्रीडा संघटना, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या बैठका पूर्ण झाल्या असून, निधी, मैदान, सुरक्षा व निवास व्यवस्थेच्या तयारीला वेग आला आहे. अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यभरातील बलाढ्य संघ जयसिंगपूरात दाखल होणार असून, शहरात क्रीडा महोत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. यामुळे शहराच्या आर्थिक घडामोडींनाही चालना मिळणार आहे.

  ही स्पर्धा प्रत्यक्षात झाल्यास, “आठ वर्षांनंतर जयसिंगपूरने क्रीडा इतिहासात नवे सुवर्णपान लिहिले,” असे निश्चितपणे म्हटले जाईल यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर सकारात्मक असल्याचे कळते.एकप्रकारे क्रीडा क्षेत्रात आलेली अनेक वर्षाची मरगळ झटकली जाणार हे निश्चित