![]()
हातभट्टी दारू, मटका राजरोस; कलेक्शन बहादूरांच्या मूक संमतीने अवैध धंद्यांचा उच्छाद
शिरोळ : प्रतिनिधी –
शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले हातभट्टी दारू, मटका आणि इतर अवैध धंदे हे केवळ कायदा-सुव्यवस्थेचे अपयश नसून, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या ‘स्वच्छ पोलीस प्रशासन’ मोहिमेची उघड उघड खिल्ली उडवत असल्याचे चित्र सध्या शिरोळ शहरात दिसून येत आहे. आदेश दिले जातात, पण अंमलबजावणी कुठे आहे? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

पोलीस निरीक्षक प्रविण खाणापूरे यांनी शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र या आदेशांचा परिणाम शून्य ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. कारण आदेशानंतर अवैध धंदे बंद होण्याऐवजी ते अधिकच ‘छुप्या’ आणि ‘संरक्षित’ पद्धतीने सुरू राहिल्याची चर्चा उघडपणे होत आहे.
आदेश निघताच तथाकथित ‘कलेक्शन बहादूर’ मैदानात उतरले. त्यांनी अवैध धंदेवाल्यांच्या भेटी घेऊन, “धंदे उघडपणे करू नका, पण थांबवूही नका. आमची मूक संमती आहे. वरिष्ठांकडून कारवाईची शक्यता निर्माण झाली, तर आधीच सूचना दिली जाईल. मात्र महिन्याचा ठरलेला हप्ता वेळेत पोहोचायलाच हवा,” अशा बिनधास्त सूचना दिल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याला काय म्हणायचं — कायद्याची अंमलबजावणी की व्यवस्थेची दलाली?
या कथित संरक्षणामुळे शिरोळ परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरूच असून, तरुणाई व्यसनांच्या गर्तेत लोटली जात आहे. हातभट्टी दारूमुळे जीवघेणे प्रकार घडत आहेत, मटक्यामुळे घराघरांत आर्थिक कंगाली वाढत आहे, आणि याची झळ सामान्य नागरिकांना बसत आहे. मात्र संबंधित यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याचा आरोप होत आहे.
पोलीस अधीक्षकांचे आदेश कागदापुरतेच आहेत का? शिरोळ पोलीस ठाणे हद्दीत नेमकं राज्य कोणाचं चालतंय? कायद्याचं की ‘कलेक्शन सिस्टिम’चं? जर हे आरोप खरे असतील, तर संबंधित कलेक्शन बहादूर, त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी आणि अवैध धंदेवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई होणार का, हा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
शिरोळमधील सुजाण नागरिक आता केवळ चर्चा न करता ठोस कारवाईची मागणी करत आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी या गंभीर आरोपांची दखल घेऊन, दोषींवर निर्भयपणे हात टाकला, तरच ‘स्वच्छ पोलीस प्रशासन’ ही घोषणा केवळ घोषवाक्य न राहता वास्तवात उतरेल. अन्यथा, ही स्वच्छता केवळ कागदावरच राहील, अशी तीव्र भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
