शरद आयुर्वेद (बीएएमएस) मेडिकल कॉलेजला मान्यता

Loading

या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरु : स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये मिळणार प्रवेश

यड्राव : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) अभ्यासक्रमासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक दृष्टीने महत्वाची भर पडली असून आयुर्वेद क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दिशा उपलब्ध झाली आहे.
महाविद्यालयाला एकूण ६० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची परवानगी मिळाली असून यामध्ये ओपनसह इतर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यी प्रवेशासाठी पात्र राहणार आहेत. राज्याच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (CET सेल) स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांना सर्व शासकिय शिष्यवृतींचा लाभ मिळणार आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ताधिष्ठित अध्यापन पद्धती, आधुनिक पायाभूत सुविधा, सर्व सुविधांनी सुसज्ज आधुनिक लॅब्स, प्रयोगशील शिक्षण पद्धतीस चालना देणारी उपकरणे व तांत्रिक सहाय्यक कर्मचारी आणि महाविद्यालयाचा “शरद पॅटर्न” म्हणून ओळखला जाणारा प्रगत शिक्षण पद्धतीचा अवलंब हे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.
महाविद्यालयाचे हॉस्पिटल, अनुभवी वैद्यकीय अधिकारी, पारंपरिक आयुर्वेदीय उपचारपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे संतुलित मिश्रण असलेली शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना ‘थिअरीसह प्रॅक्टिकल’चा सर्वांगिण अभ्यास देणार आहे.
-अनिल बागणे, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर, शरद शिक्षण संकुल
“राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगत, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापनपद्धतीचा अवलंब करणारा म्हणून ‘शरद पॅटर्न’ला आज वेगळीच ओळख मिळाली आहे. तांत्रिक शिक्षणात उत्कृष्टता साधल्यानंतर आता आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रातील BAMS अभ्यासक्रमाची भर शरद समूहात पडत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे महाविद्यालय उभे राहणे हा केवळ एक प्रकल्प नसून संपूर्ण शरद परिवाराच्या एकजुटीचा, सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि कार्यरत असलेल्या सर्व स्टाफच्या समर्पित परिश्रमांचा परिणाम आहे. शिक्षण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्याचे आमचे कार्य असेच पुढेही सुरू राहील.”