![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या जयसिंगपूर शहर विकास पॅनेलच्या माध्यमातून शहराला विकासाच्या दृष्टीकोनातून सक्षम पर्याय मिळाला असून जयसिंगपूर शहरातील जनता या आघाडीसोबत राहिल असा विश्वास आघाडीचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत दिला.
कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशीची होत आहे. जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून मा. खासदार राजू शेट्टी , उद्यानपंडित गणपतराव पाटील व माधवराव घाटगे यांनी एकत्रित येवून
सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीसमोर नगराध्यक्ष पदासह सक्षम पर्याय देण्यात आले आहेत.शहरातील पिग्मी एजंट ते नामांकित चार्टर्ड अकौंटट म्हणून सामान्य कुटूंबातून आलेले सुदर्शन कदम यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ ते १३ मध्ये आघाडीच्या माध्यमातून सर्व उमेदवार करण्यात आलेले आहेत.
जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील आरक्षण पडलेल्या जमिनीची मुदत संपली आहे त्या सर्व जमीनी परत करणे , शहरातील गार्डन अद्यावत करणे , नगरपालिका शाळा दर्जेदार करणे, वाढीव भागात पायाभूत सुविधा , महिला सुरक्षेसाठी व शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी संपुर्ण शहरात सीसीटीव्ही बसविणे , सार्वजनिक शौचालय सुविधा , अधुनिक भाजीमंडई , शहराला स्वच्छ व मुबलक पाणी, झोपडपट्टी नियमितीकरण , आरोग्यसुविधा , नगरपालिका सर्व शासकीय सुविधा ॲानलाईन नागरीकांना उपलब्ध करून देण्यासह , टक्केवारी व भ्रष्ट्राचार मुक्त नगरपालिका यासह शहराच्या सर्वांगीण विकासावर निवडणूक लढवित असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील , गुरूदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे , राजवर्धन नाईक निंबाळकर , मा. नगराध्यक्ष निता माने , डॅा. महावीर अक्कोळे , सर्जेराव पवार , विजय भोजे , शेखर पाटील , अशोकराव कोळेकर , राहूल घाटगे , नितीन बागे यांचेसह आघाडीचे सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.
